गच्चीवरील बागेमुळे पर्यावरण संवर्धनात ‘खारीचा वाटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:42+5:302021-06-05T04:08:42+5:30
शहरात छोटे-छोटे बदल ठरतील पोषक; मोठ्या सोसायट्यांमध्ये शक्य पुणे : पर्यावरणपूरक घरे बांधायची झाली तर दगड, चुना यांचा वापर ...
शहरात छोटे-छोटे बदल ठरतील पोषक; मोठ्या सोसायट्यांमध्ये शक्य
पुणे : पर्यावरणपूरक घरे बांधायची झाली तर दगड, चुना यांचा वापर करायला हवा. पण सध्याच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर दगड जमिनीतून किंवा खाणीतून काढणे अवघड आहे. पण सार्वजनिक इमारती या तरी दगडी बांधता येऊ शकतात. शहरातील अनेक शासकीय इमारती दगडीच आहेत. आताच्या स्थितीमध्ये इमारतींच्या गच्चीवर माती पसरून झाडं लावली किंवा कुंड्यांमध्येही रोपं लावली तर पर्यावरण चांगले राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हवामानातील तापमानही कमी होईल, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी दिली.
पूर्वी पुणे शहर थंड हवेचे ठिकाण होते. म्हणूनच ब्रिटिश येथे राहत. पुढे ज्येष्ठ नागरिकदेखील निवृत्तीनंतर पुण्याचा पर्याय निवडत असत. पण आता पुण्याचे पर्यावरण बदलले आहे. तापमान वाढलेय, ओढ्याला पूर येतोय, झाडं कमी झाली आहेत. पण आता पर्यावरणपूरक गोष्टी करता येऊ शकतात.
महाजन म्हणाले,‘‘पुण्यातील रस्ते, फुटपाथ आणि इमारतींच्या आवारातील मोकळ्या जागा या सर्व ठिकाणी पावसाचे पाणी मुरायला कोठेच जागा नाही. लहान रस्त्यांवर जेथे फुटपाथ नसताताच, तेथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अगदी इमारतींच्या कुंपणभिंतीपर्यंत काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण केले जाते. शहरात पाणी मुरण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा भूजलाची पातळी खालावते. काँक्रीटचे दुष्परिणाम दिसल्याने आता इको फ्रेंडली हाऊसिंग हा प्रकार समोर आला आहे. त्यात गच्चीवर झाडं लावली जातात, पण अनेकदा परदेशीच झाडं लावतात, जी शोभेची असतात. ती लावू नयेत. औषधी वनस्पती, देशी झाडं लावावीत, जेणेकरून इथल्या हवामानाला पूरक ठरतील.
=============================
गच्चीवरील बागेमुळे ‘मायक्रोक्लायमॅटिक इफेक्ट’
पर्यावरणसंवर्धक बांधकामात इमारतींच्या गच्चीवर बाग तयार करणे आवश्यक आहे. स्लॅबची रचना व वाॅटरप्रूफिंग करण्यात यावे. गच्चीवर माती पसरून झाडे लावली तर स्लॅब गळत नाही. उन्हात गच्ची तापत नाही. शहरातील गच्ची हिरव्यागार झाल्या तर शहराचे एकूण तापमान थोडे का होईना अनुकूल होईल. ज्याला मायक्रोक्लायमॅटिक इफेक्ट म्हणतात.
============================
सिमेंटच्या रस्त्यांऐवजी डांबरी बरे
रस्ता बांधताना सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्याची लाट आलीय. त्याने तापमानात वाढच होते. जंगली महाराज रस्ता ५० वर्षांपूर्वी डांबरीकरण केला. तो आजही चांगला आहे. पण सिमेंटचा रस्ता सहा महिन्यांत खराब होतो. काँक्रीट रस्त्याने वाहनाच्या टायरची झीज होते, डांबरी रस्त्याने कमी होते. आज प्लास्टिक, डांबरीकरण होते. ते देखील उत्तम पर्याय आहे.
====================