फुलांचे हार, सुवासिनींकडून औक्षण अन् गावजेवण; शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 10:32 AM2024-07-03T10:32:42+5:302024-07-03T10:33:45+5:30
फुलगाव येथे एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गर्भवती गायीचे डोहाळे साजरे करून ग्रामस्थांना जेवण दिले आहे...
- भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव (पुणे) : एखाद्या महिलेचं डोहाळे साजरे केल्याचे आपण सर्रास ऐकतो. मात्र एखाद्या गाईचे डोहाळे साजरे केल्याचे आपण कधी ऐकले नसेल. मात्र फुलगाव येथे एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गर्भवती गायीचे डोहाळे साजरे करून ग्रामस्थांना जेवण दिले आहे.
गाय आणि भारतीय संस्कृतीचे नातं अगदी अनादी काळापासून आहे. हिंदू धर्मात भूमी, जन्मदात्री, जन्मभूमी आणि गाय यांना मातेचा दर्जा दिलेला आहे. गाईचे दूध हे शक्तिवर्धक, बुद्धीवर्धक असून गाईचे गोमूत्र शेकडो रोगांवर रामबाण इलाज आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. गाईच्या शेणापासून केलेली शेती ही अति उत्कृष्ट सेंद्रिय शेतीचे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनाही गाई अत्यंत प्रिय आहे. या पार्श्वभूमीवर फुलगाव येथील अतुल वागस्कर यांनी आपल्या गाईचे डोहाळे साजरे करून ग्रामस्थांना जेवण देत गाई विषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.
वागस्कर कुटुंब हे घरातील सदस्याप्रमाणे आपल्या गोठ्यातील प्राण्यांनाही चांगली वागणूक देत आहेत. गाय तर त्यांची अत्यंत प्रिय आहे. गाईला वासरू होणार म्हणून त्यांनी गाईच्या प्रसूतीपूर्वी गाईचे डोहाळे घालण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी गाईला स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. फुलांचे हार घालून गाईला सजविण्यात आले. त्यांनतर सुवासिनींच्या हस्ते गाईचे पूजन करून औक्षण करण्यात आले. गाईला गोड नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर इतर ग्रामस्थांनाही जेवण देण्यात आले. आमची गाय ही लाडकी आहे. जर आपण घरातील महिलेचे डोहाळे साजरे करतो तर आपल्या गायीचेही डोहाळे साजरे केले पाहिजे. या उद्देशाने आम्ही मोठ्या आनंदाने आमच्या गायीचे डोहाळे साजरे केल्याचे अतुल वागस्कर यांनी सांगितले.