राज्यात गारठा वाढला! पुण्यात एनडीएला कडाक्याची थंडी, तापमान ९.९
By श्रीकिशन काळे | Published: January 23, 2024 01:22 PM2024-01-23T13:22:15+5:302024-01-23T13:22:45+5:30
दुपारी लख्ख उन्ह पडल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा
पुणे : सध्या किमान तापमानामध्ये सतत चढ-उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात चांगलीच थंडी वाजू लागली आहे. धुळ्यामध्ये यंदाच्या हंगामामधील नीचांकी ६.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांतही राज्यात आणि मध्य महाराष्ट्रात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, पुण्यात एनडीएमध्ये निचांकी किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यामुळे पुणेकरांना कडाक्याची थंडी वाजली.
सध्या गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. तसेच सोमवारी (दि. २२) मध्य प्रदेशातील दातीया यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच हरियाना, पंजाब, चंदीगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेशात किमान तापमान ३ ते ७ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. त्यामुळे उत्तर भारतात धुके, थंडीची लाट आणि गारठा असेच हवामान अनुभवायला मिळत आहेे.
पुण्यात देखील किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. सकाळी आणि सायंकाळी थंडीचा कडाका जाणवत आहे. दुपारी लख्ख उन्ह पडल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे.
शहरातील किमान तापमान
एनडीए : ९.९
शिवाजीनगर : ११.४
पाषाण : १२.४
लोणावळा : १२.५
हडपसर : १४.१
कोरेगाव पार्क : १६.१
मगरपट्टा : १६.३
वडगावशेरी : १८.०