गॅस, पेट्रोल दरवाढीने आई-बाबा दोघेही घायकुतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:33+5:302021-02-10T04:11:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वयंपाकाचा गॅस व पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने घराघरातील आई-बाबा घायकुतीला आले आहेत. महिनाभराचे त्यांचे ...

Gas and petrol price hikes hurt both parents | गॅस, पेट्रोल दरवाढीने आई-बाबा दोघेही घायकुतीला

गॅस, पेट्रोल दरवाढीने आई-बाबा दोघेही घायकुतीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्वयंपाकाचा गॅस व पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने घराघरातील आई-बाबा घायकुतीला आले आहेत. महिनाभराचे त्यांचे अंदाजपत्रक महागाईच्या वणव्याने ढासळू लागले आहे. पेट्रोल आता प्रतिलिटर शंभरीकडे तर गॅसची एक टाकी हजाराकडे वाटचाल करू लागली आहे.

रोजच्या जगण्यासाठी आवश्यक या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींचे दर अस्थिर झाले आहेत. प्राप्ती तेवढीच आणि खर्च जास्त अशा व्यस्त गणितात संसार चालवायचा कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. या दोन्हीच्या दरावर खाद्यपदार्थ व अन्य वस्तूंचेही दर अवलंबून असल्याने महागाईतून वाटचाल कशी करायची या चिंतेत सामान्य माणूस आहे.

पेट्रोलचा आताचा दर ९३ रूपये ४८ पैसे प्रतिलिटर आहे. डिझेल ८२ रूपये ७४ पैसे व सीएनजी गॅस ५५ रूपये ५० पैस प्रतिकिलो आहे. तीन महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबरमध्ये हा दर पेट्रोल ८८ रुपये ६९ पैसे, डिझेल ७७ रुपये ४७ पैसे, सीएनजी ५३ रूपये ८५ पैसे असा होता. लिटरमागे पाच साडेपाच रूपयांचा फरक पडू लागल्याने बहुतेकांचे गणित बिघडू लागले आहे.

स्ययंपाकाच्या गॅसची टाकी नोव्हेंबरमध्ये ६०० रूपयांना होती. फेब्रुवारीत ती ७२२ रूपये ५० पैसे इतकी महागली आहे. थेट १२२ रूपये ५० पैशांचा फरक पडल्याने गृहिणींमध्ये रोष आहे. गॅसचे अनुदान काही कुटुंबांना आता पूर्वीसारखे मिळत नाही. अनुदानित गॅस टाकीची किंमत व विनाअनुदानित टाकीची किंमत सारखीच झाल्याने अनुदान मिळत नसल्याचे वितरक सांगतात. त्यामुळे टाकीचे सगळे पैसे ग्राहकालाच द्यावे लागतात.

चौकट

गॅसची दरवाढ असह्य झाली आहे. अन्य गोष्टींमध्ये काटकसर करता येते. गॅस तर जेवढा लागतो तेवढा लागतोच. त्याचे दर वाढल्याने खर्चाचा ताळमेळ बिघडला.

मनीषा महाले, सिंहगड रस्ता.

-----------------

कोरोनामुळे आमच्या उत्पन्नात घट झाली. आता महागाईने नाकी नऊ आणले. सगळेच महाग होत चालले आहे.

शुभांगी कानडे, गुरुवार पेठ

--------------------------------

१०० रूपयांचे पेट्रोल टाकले की गाडी चार दिवस चालायची. आता ती चार दिवस चालतेच, पण त्यासाठी १२५ रुपये मोजावे लागतात. सरकारने किमान पेट्रोलचे तर तरी नियंत्रणात ठेवावेत.

केशव सरोदे, सहकारनगर

चौकट (आकडे सर्व रुपये)

नोव्हेंबर २०२०

पेट्रोल प्रतिलिटर - ८८.६९

डिझेल प्रतिलिटर - ७४.४७

सीएनजी- ५३.२५

गॅस टाकी- ६००

--------------

डिसेंबर २०२१

पेट्रोल- ८९.७१

डिझेल- ७८.७१

सीएनजी- ५३.८५

गॅस टाकी- ६९७.५०

-------------------

जानेवारी २०२१

पेट्रोल- ९२.५२

डिझेल-८१.७२

सीएनजी-५५.५०

गॅस टाकी- ६९७.५०

-------------------

फेब्रुवारी २०२१

पेट्रोल- ९३.४८

डिझेल-८२.७४

सीएनजी- ५५.५०

गॅस टाकी- ७२२.५०

---------------

Web Title: Gas and petrol price hikes hurt both parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.