अरे देवा... गॅस कनेक्शन, रेग्युलेटरही महागले !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 09:04 AM2022-06-29T09:04:54+5:302022-06-29T09:09:03+5:30

नवे कनेक्शन तब्बल ७५० रुपयांनी महागले...

gas connections regulators are also expensive inflation pune latest news | अरे देवा... गॅस कनेक्शन, रेग्युलेटरही महागले !

अरे देवा... गॅस कनेक्शन, रेग्युलेटरही महागले !

Next

पुणे : पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत ७५० रुपयांची वाढ केली असून, एका गॅस सिलिंडरसाठी आता १४५० रुपये मोजावे लागणार आहेत. सततच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या गृहिणींना सिलिंडर दरवाढीमुळे आणखी एक धक्का बसला आहे, तर सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ केली होती. एप्रिल महिन्यात दर स्थिर होते. आता पुन्हा एकदा वाढ झाल्याने घराचे बजेट बिघडणार हे निश्चित.

नवे कनेक्शन ७५० रुपयांनी महागले

पेट्रोलियम कंपन्यांकडून १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनसाठी प्रति सिलिंडर ७५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

रेग्युलेटर आता २५० रुपयांना

पूर्वी १५० रुपयांना मिळणारे गॅस रेग्युलेटर आता २५० रुपयांना मिळणार आहे, तसेच ५ किलोच्या सिलिंडरसाठी सुरक्षा ठेव आता ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे.

दोन सिलिंडरसाठी दीड हजार जास्त

२ सिलिंडरचे कनेक्शन घ्यायचे असेल, तर त्यासाठी अतिरिक्त १५०० रुपये भरावे लागणार आहेत, तर ४४०० रुपये सुरक्षा ठेव म्हणून ठेवावे लागणार आहेत. या आधी २९०० रुपये लागत होते. १६ जूनपासून हा नवीन बदल करण्यात आला आहे.

सततच्या दरवाढीमुळे घराचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे. पुन्हा दरवाढ झाल्याने घराचे बजेट कोलमडणार आहे. सरकारने किमती स्थिर ठेवाव्यात.

- मानसी सोमण, गृहिणी

आतापर्यंत पेट्रोल महाग होत होते. आता गॅसच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. सरकारने गॅसचे दर स्थिर ठेवण्यासाठी विशेष धोरण तयार करावे. पेट्रोलियम कंपन्यांवर नियंत्रण आणावे.

- केतकी पाध्ये, गृहिणी

Web Title: gas connections regulators are also expensive inflation pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.