पुणे जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि ४ ग्रामपंचायतीत अत्याधुनिक गॅस शवदाहिनी बसविण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:05 PM2021-06-09T21:05:27+5:302021-06-09T21:07:47+5:30
राज्यात पुणे जिल्ह्यातच ग्रामीण भागात गॅसशवदाहिनीचा प्रयोग: डॉ. राजेश देशमुख
पुणे : पारंपारिक अंत्यसंस्कार विधीमुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक अडचणी येतात. यामुळेच पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागात नगरपालिका आणि मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच अत्याधुनिक गॅस शवदाहिन्याचे काम हाती घेण्यात आले. पुणे जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 12 नगरपालिका आणि चार ग्रामपंचायतीमध्ये गॅस शवदाहिन्या बसविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली.
ग्रामीण भागात आजही पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार केले जातात. यात अनेक वेळा मृतदेह जाळण्यासाठी आवश्यक असलेला लाकूड, फाटा गोळा करणे कठीण होते, मृतदेह अर्धवट जाळला जातो आणि त्यात आता कोरोना महामारीचे संकट आणि कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे अधिकच कठीण होते. लाकडाच्या धुरामुळे पर्यावरण हानी तर होतेच तसेच प्रदुर्षणामध्ये मोठी भर पडते. यामुळेच पर्यावरण रक्षणासह आर्थिक खर्च टाळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत गॅस शवदाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी एका गॅस शवदाहिनीच्या कामासाठी 90 लाख ते एक कोटी पर्यंत खर्च येतो. सध्या बहुतेक सर्व मजुर गॅस शवदाहिन्यांचे काम सुरू असून, पुढील काही दिवसात काम पूर्ण होऊन लोकांना प्रत्यक्ष वापर करता येणार आहे. या गॅस शवदाहिन्या कोरोना काळात कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक वरदानचं ठरणारआहेत.
-------
या नगरपालिकांमध्ये होणार गॅस शवदाहिनीची सोय
बारामती नगरपालिका - 3, भोर नगरपालिका - 2, इंदापूर- 1, जुन्नर -1, लोणावळा - 1, वडगावमावळ - 1, सासवड -1, शिरूर- 1
-------
या चार ग्रामपंचायतींमध्ये गॅस शवदाहिन्याचे काम सुरू
आंबेगाव- मंचर, जुन्नर- ओतूर, राजुरी, हवेली - उरळीकाचन
-------
पर्यावरण रक्षणासह आर्थिक खर्च कमी होणार
कोरोना काळात ग्रामीण भागात देखील गॅस व विद्युत शवदाहिन्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळेच जिल्ह्यात तातडीने नगरपालिका आणि मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये गॅस शवदाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासह आर्थिक खर्चात मोठी बचत होणार आहे.
- डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
-------