गॅस दरवाढीने उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:21+5:302021-08-20T04:15:21+5:30

गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा २५ रुपयांनी वाढ; गृहिणींना मोजावे लागणार ८६२ रुपये लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्च महिन्यात ...

Gas prices skyrocketed | गॅस दरवाढीने उडाला भडका

गॅस दरवाढीने उडाला भडका

Next

गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा २५ रुपयांनी वाढ; गृहिणींना मोजावे लागणार ८६२ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्च महिन्यात तब्बल तीन वेळा घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने मध्यमवर्गीय गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले होते. एप्रिलमध्ये निवडणुकांमुळे गॅसदरात कपात करण्यात आली. एप्रिल ते जूनपर्यंत गॅस सिलिंडरचे दर काहीसे स्थिर राहिल्याने गृहिणींना थोडाफार का होईना दिलासा मिळाला. १ जुलैला सिलिंडरच्या दरात आधीच २५ रुपयांनी वाढ झाली होती. आता पुन्हा आॅगस्टमध्ये २५ रूपयांनी वाढ झाल्यामुळे आता एका गॅस सिलिंडरसाठी ८६२.५० रूपये मोजावे लागणार आहेत. दिवसेंदिवस जगणं महाग होत चालल्यामुळे गृहिणी मेटाकुटीला आल्या आहेत. या वाढत्या महागाईला तोंड द्यायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

एका कुटुंबाचा विचार केला तर कुटुंबात किमान चार ते पाच व्यक्ती असतात. त्यानुसार दर महिना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चासाठी लागणाऱ्या रकमेचे गृहिणी अंदाजपत्रक तयार करीत असतात. नवीन वर्षातच गृहिणींना गॅस दरवाढीने जोरदार दणका दिल्याने त्यांचे अंदाजपत्रकच पूर्णत: कोलमडून गेले आहे. पूर्वी गॅस सिलिंडरवर विशिष्ट सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा केली जायची. मात्र आता ती देखील बंद झाल्याने चढ्या भावानेच गॅस सिलिंडर खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. जानेवारीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर हा ६९७ रुपये इतका होता. फेब्रुवारीअखेरर्यंत हा दर ७९७ रुपयांपर्यंत पोहोचला. मार्चमध्ये ८२२ रुपये मोजावे लागले आणि तीन महिन्यांत स्थिर राहिलेल्या दरात जुलैमध्ये पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली. आता दीड महिन्यातच पुन्हा २५ रूपये वाढीची भर पडली आहे. या वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असून, सांगा जगायचं कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

--------------------------------------------------------------

दोन वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरचा दर हा ४०० रुपये होता. आता त्याची किंमत ही ८३७ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एका कुटुंबाकडे किमान २ गॅस सिलिंडर असतात, हे गृहीत धरले तर वाढत्या किमतीनुसार त्याची किंमत ही १६०० रुपयांच्या घरात जाते. याबरोबर भाजीपाला, दूधसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीचा सामना करावा लागतो तो वेगळाच. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या तारखेला जे अंदाजपत्रक ठरवू ते तसेच असेल, असे सांगता येत नाही. त्याच्यामध्ये वाढच झालेली पाहायला मिळते.

- स्मिता देशपांडे, गृहिणी

--------------------------------------------------------------

लॉकडाऊन काळात घरगुती व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे कुटुंबाव्यतिरिक्त व्यवसायासाठीही दोन गॅस सिलिंडर अतिरिक्त लागत आहे. घरगुती गॅससाठी ८३७ रुपये तर व्यावसायिकांसाठी १६२५ रुपये मोजावे लागणार आहेत. व्यवसायातून अजून म्हणावं तेवढं उत्पन्न मिळत नाही, पण खर्च मात्र वाढत चालला आहे. महिन्याच्या अखेरीस हातात काहीच पैसे राहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे - अंजली विनायक सोमण, गृहिणी आणि व्यावसायिक

--------------------------------------------------------------

“एप्रिलमध्ये निवडणुकांमुळे गॅस सिलिंडरच्या किमती उतरल्या. त्या जूनपर्यंत स्थिर राहिल्या. जुलै महिन्यात बाजारमूल्यात वाढ झाल्याने दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भविष्यात गॅस सिलेंडरच्या वाढच होण्याची शक्यता आहे. ओएनजीसीनुसार डिसेंबरपर्यंत ६० टक्क्यापर्यंत दरात वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने गॅस सिलिंडरवरची सबसिडी बंद केली आहे. याचा मध्यमवर्गीयांना नक्कीच फटका बसला आहे.”

- गॅस वितरक

----------------------------

असे वाढले सिलिंडरचे दर (रुपये)

महिना घरगुती (१४ किलो) व्यावसायिक (१९ किलो)

२०२०

ऑगस्ट ५९७ ११३६.५०

सप्टेंबर ५९७ ११३४.५०

ऑक्टोबर ५९७ १३६८

नोव्हेंबर ५९७ १२३६

डिसेंबर ६४७ १३२७

------------------------------------

२०२१

जानेवारी ६९७ १३४३.५०

फेब्रुवारी ७९७ १५३४

मार्च ८२२ १६१०

एप्रिल ८१२ १६४०.५०

मे ८१२ १६२५

जून ८१२ १४७३

जुलै ८३७.५० १५५०

आॅगस्ट ८६२.५० १६२५

Web Title: Gas prices skyrocketed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.