आयटी पार्कमधील गॅस चोरीचा पर्दाफाश; हिंजवडी फेज दोनमध्ये पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:32 AM2024-02-27T09:32:57+5:302024-02-27T09:33:26+5:30
हिंजवडी फेज दोन येथे बोडकेवाडीत शनिवारी (दि. २४) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही कारवाई झाली...
पिंपरी : आयटी पार्क परिसरात गॅस चोरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला. बेकायदेशीररित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून चोरी केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने कारवाई केली. हिंजवडी फेज दोन येथे बोडकेवाडीत शनिवारी (दि. २४) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही कारवाई झाली.
सचिन बिरा मेटकरी (२४, रा. बोडकेवाडी, फेज २, हिंजवडी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार उमेश पुलगम यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २५) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या कोणत्याही सुरक्षितते शिवाय मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम शेळके तपास करीत आहेत.