कुरकुंभला रिअॅक्टरच्या स्फोटामुळे गॅसगळती
By admin | Published: February 14, 2015 10:54 PM2015-02-14T22:54:37+5:302015-02-14T22:54:37+5:30
येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘आर्थोकेम’ कंपनीमध्ये रिअॅक्टरच्या स्फोटामुळे गॅसगळती झाली. यामध्ये एक कामगार जखमी झाला,
कुरकुंभ : येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘आर्थोकेम’ कंपनीमध्ये रिअॅक्टरच्या स्फोटामुळे गॅसगळती झाली. यामध्ये एक कामगार जखमी झाला, तर काही कामगारांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेत सिद्धेश्वर रणदिवे (वय ३५, सध्या रा. कुरकुंभ) हा कामगार जखमी झाला आहे. दरम्यान शनिवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास येथील आर्थोकेम कंपनीमध्ये फॅब्रिकेशनचे काम सुरू होते. या वेळी उत्पादनाची चाचणी चालू असताना रिअॅक्टरमधील वायू बाहेर पडण्याची व्यवस्था नसल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कंपनीमध्ये काही प्रकारच्या रसायनांचे ट्रेडिंग केले जाते; मात्र ट्रेडिंगसाठी आणलेल्या रसायनचा वापर करून बेकायदेशीररीत्या त्यावर चाचणी कंपनीत करीत असल्याचे बोलले जात आहे.
ही घटना घडल्यानंतर कामगार रणदिवे याने वेळीच पळ काढल्याने तो वाचला; पण यामध्ये तो जखमी झाला आहे. या कंपनीमधील ही दुसरी घटना असून, त्याआधीदेखील या कंपनीत स्फोट होऊन कामगार गंभीर जखमी झाल्याने कायमचे अंपगत्व आलेले आहे. अशातच कंपनीची शासनाच्या नियमाप्रमाणे परवानगी रद्द व्हावी, यासाठी तक्रार अर्ज पुणे फॅक्टरी इन्सपेक्टरकडे देण्यात आली आहे. या स्फोटांमुळे औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
कंपनीच्या गेटवर नामफलकच नाही
आर्थोकेम या कंपनीच्या गेटवर नामफलकदेखील नसून, अग्निशामक दल अथवा आपत्ती व्यवस्थापनाने या कंपनीपर्यंत कसे पोहोचायचे, हादेखील एक मोठा प्रश्न आहे. या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.