वारज्यात गॅसगळती होऊन भीषण स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:18 AM2019-02-19T02:18:24+5:302019-02-19T02:18:42+5:30
पती-पत्नी जखमी : घराचे सेफ्टी डोअरही तुटले
पुणे : वारज्यातील राजयोग सोसायटीत घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होऊन भीषण स्फोट झाला़ हा स्फोट इतका मोठा होता, की त्या घरातील सेफ्टी डोअर उडून समोरील इमारतीबाहेर लावलेल्या गाड्यांवर पडले.या घटनेत घरातील पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ ही घटना रात्री ९ वाजता घडली़
छाया वचकवडे आणि ज्ञानेश्वर वचकवडे, अशी या पती-पत्नींची नावे आहेत़ याबाबत अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले, की वारजे गावठाणातील गीतांजली कॉलनीत राजयोग सोसायटी आहे़ तेथे वचकवडे यांचा माऊली सावली ही ३ मजली इमारत आहे़ तळमजल्यावर वचकवडे हे राहतात़ रात्री नऊच्या सुमारास ते दोघेही घरात असताना गॅसगळती झाली़ सिलिंडरमधील गॅस संपूर्ण घरात पसरला़ त्यानंतर त्याचा भीषण स्फोट झाला़ त्यात हे दोघे पती-पत्नी भाजले़ त्यांना नागरिकांनी तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले़
हा स्फोट इतका भीषण होता, की त्यात स्वयंपाक घरातील किचन ओट्याचे मार्बल तुटले़ त्या खोलीचा दरवाजा तुटून पडला़ घराचे सेफ्टी डोअर तुटून उडाले व समोरच्या इमारतीजवळ लावलेल्या गाड्यांवर जाऊन पडले. त्यात काही गाड्यांचे नुकसान झाले़ घरातील सर्व सामान या स्फोटात अस्ताव्यस्त झाले़ घरातील फ्रिजही तुटला़ भिंतीला तडे गेले़ तसेच, शेजारच्या घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या़
४गेल्या काही दिवसांत आग लागल्यानंतर त्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटांमध्ये ही घटना भीषण ठरली आहे़