ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमले; ३ पकडले, ३ सटकले, कात्रज परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 10:10 AM2024-11-25T10:10:34+5:302024-11-25T10:10:49+5:30
कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काहीजण जमले असून, त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
पुणे : कात्रज परिसरातील एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी पकडले. खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या तीन अल्पवयीनांसह सहाजणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी चेतन नारायण गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांसह उर्वरित तीन अल्पवयीन मुलांवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कात्रज गावात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काहीजण जमले असून, त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे पथक पाठवून या मुलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तिघांना पकडण्यात यश आले. मात्र, तिघे पळून गेले. यश रोहिदास बोरकर (वय १८), प्रसाद राजू कांबळे (१९) आणि आर्यन दत्तात्रय काळे (१८, दोघे रा. अंजनीनगर, गणेश कॉलनी, कात्रज) यांना अटक केली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता, पालघन, मिरची पूड व दुचाकी जप्त केली आहे.
अधिक चौकशी केल्यावर आरोपी कात्रज गावातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमल्याचे समोर आले. आरोपींमध्ये तिघे अल्पवयीन असून, त्यांच्यातील एकाच्या नावावर यापूर्वी खुनाचा गुन्हाही दाखल आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करीत आहेत.