इंद्रायणीतीरी वैष्णवांचा मेळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:55 AM2018-12-04T00:55:45+5:302018-12-04T00:55:51+5:30
भल्या पहाटेचे थंडावणारे वातावरण... सनई-चौघड्यांचा मंजूळ स्वर... मंदिरातील आकर्षक फुलांच्या सजावटीसह रंगावली.
आळंदी : भल्या पहाटेचे थंडावणारे वातावरण... सनई-चौघड्यांचा मंजूळ स्वर... मंदिरातील आकर्षक फुलांच्या सजावटीसह रंगावली... त्यात अभिषेकाचा वेदमंत्र जयघोष... अशा ज्ञानभक्ती मंगलमय वातावरणात कार्तिकी एकादशीदिनी सोमवारी (दि. ३) सुमारे तीन लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत पवमान अभिषेक हरिनाम गजरात झाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी कार्तिकी वारी अर्पण करण्यास आलेल्या भाविकांच्या नामगजराने अलंकापुरी दुमदुमली. दिवसभर दिंड्यांतून नगरप्रदक्षिणेदरम्यान नामगजर सुरू होता. उद्या मंगळवारी (दि. ४) द्वादशीदिनी आळंदीत ‘श्रीं’चा रथोत्सव होत आहे.
पूजेस पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पदमनाभन, उपायुक्त स्मार्तना पाटील, आयुक्त मकरंद रानडे, प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, यात्रा समिती सभापती पारूबाई तापकीर, माजी नगराध्यक्षा शरद वडगावकर, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, राहुल चिताळकर पाटील, तहसीलदार सुचित्रा आमले, मंडलाधिकारी चेतन चासकर, व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, मालक बाळासाहेब आरफळकर तसेच आळंदी नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, भाविक व निमंत्रित उपस्थित होते. या वेळी ‘श्रीं’च्या पूजेचे पौरोहित्य राहुल जोशी यांच्यासह ११ ब्रह्मवृंदांनी केले.
आळंदी कार्तिकी वारीअंतर्गत होत असलेल्या माउलींच्या ७२३वा संजीवन समाधी दिन सोहळ्यास राज्यासह परिसरातील पंचक्रोशीतूनही यात्रेस आलेल्या वारकऱ्यांची गर्दी होती. ‘श्रीं’च्या दर्शनाच्या ओढीने आलेले वारकरी आळंदीत हरिनाम गजरात ठिकठिकाणी दंग होते. पहाटे पवमान पूजेसाठी ‘श्रीं’च्या दर्शनास भाविकांची रांग रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बंद करण्यात आली होती. दरम्यान, परंपरेने ‘श्रीं’चे मंदिर व गाभारा स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी देऊळवाडा परिसर स्वच्छ केला. रात्री घंटानाद झाल्यानंतर ‘श्रीं’चे संजीवन समाधीला पवमान अभिषेक व पूजा वेदमंत्र जयघोषात सुरू झाली. भीमराव वाघमारे यांचे नगारखान्यातून सनईचौघड्याचे मंगलमय स्वर निघाले. मंत्रमुग्ध करणाºया वातावरणात पहाटपूजा बांधण्यात आली. दरम्यान, मंदिरात पहाटे सनईचौघड्याचा मंजूळ स्वर तसेच ११ ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषाने ‘श्रीं’च्या गाभाºयात ‘श्रीं’ची पूजा दीडच्या सुमारास झाली. आरतीनंतर प्रथानिमंत्रितांना नारळ प्रसाद व दर्शनास सोडण्यात आले.
भाविकांना दोनच्या सुमारास प्रत्यक्ष दर्शन सुरू झाले. दरम्यान, याच वेळी मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरातही या वेळी वेदमंत्रघोषात रुद्राभिषेक सुरू होता. ‘श्रीं’च्या संजीवन समाधीवर वैभवी चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला.
पंचामृत अभिषेकात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे अत्तर अर्पण करून ‘श्रीं’ची वैभवी पहाटपूजा बांधण्यात आली. या पूजेत ‘श्रीं’ना विविध आकर्षक वस्त्रे, अलंकार, दागिने, पुष्पसजावट करून सजविले. मंदिरात आकर्षक विद्युतरोषणाई व लक्षवेधी रंगा वलीने मंदिर वैभव पहाटपूजेत अधिक
सजले. या वर्षीचे पहाटपूजा पौरोहित्य राहुल जोशी यांच्यासह ११ ब्रह्मवृंदांनी केले.
कार्तिकी एकादशी दिनी भाविकांच्या मंदिरात महापूजा बंद ठेवण्यात आल्या. यामुळे भाविकांना ‘श्रीं’चे दर्शन कमी वेळेत सुलभ झाले. भाविकांची दर्शनास गर्दी आणि कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
महिला वृद्ध भाविकांना ओढल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एकादशी दिनी मंदिरातील प्रथांचे पालन
करीत महानैवेद्यानंतर दुपारी ‘श्रीं’च्या पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात निघाली. तत्पूर्वी, संत नामदेवराय यांच्या पादुका पालखीतून नगरप्रदक्षिणा उत्साहात झाली.
प्रदक्षिणेदरम्यान ‘श्रीं’च्या पालखी दर्शनास भाविकांनी गर्दी केली. ग्रामप्रदक्षिणा करीत ‘श्रीं’ची वैभवी पालखी मंदिरात हरिनाम गजरात प्रवेशली. भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर तसेच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी
गर्दी होती.
>ओळखपत्र प्रवेश, बोगस पास आणि बैठक व्यवस्थेने पहाटपूजा गाजली
रात्री झालेल्या पहाटपूजेवेळी पोलिसांकडून महाद्वारातून मंदिर प्रवेश देताना पासधारकांना पास असताना सोडण्यात हयगय केल्याने निमंत्रित पासधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. निमंत्रितांना मंदिरप्रवेश तसेच पहाटपूजेच्या प्रसंगी पंखा मंडपात बसविणे आवश्यक असताना यात्रा समिती सभापती यांना सन्मानित करण्यात आले नाही. यामुळे त्यांनी देवस्थानाच्या नारळ प्रसादावर बहिष्कार घातला.
अनेक पदाधिकाºयांना मंदिरात प्रवेश मिळविताना पोलीस प्रशासनासमवेत हुज्जत घालावी लागली. यातून वाद निर्माण झाला. मात्र, नंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने महाद्वार प्रवेश दरवाजावरील ड्युटीवरील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना इतरत्र हलविले. त्यानंतर वाद निवळला.
मंदिरात गेल्यानंतर परत नगर परिषदेचे पदाधिकारी, महिला यांना बैठक व्यवस्थेत प्राधान्य न दिल्याने नाराजी व्यक्त झाली. मंदिरात पदाधिकाºयांचा सन्मान राखला जाईल. याबाबत दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन प्रमुख विश्वस्तांनी देऊनदेखील याही वेळी पदाधिकाºयांना सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
>‘श्रीं’चा आज वैभवी रथोत्सव
आळंदी कार्तिकी यात्रेतील परंपरेने ‘श्रीं’चा रथोत्सव मंगळवारी (दि. ४) द्वादशीदिनी सायंकाळी चारच्या सुमारास निघणार आहे. गोपाळपुरातील श्रीकृष्ण मंदिर प्रांगणातून वैभवी रथोत्सव सुरू होईल. फडकरी, मानकरी, दिंडीचालक-मालक, प्रमुखांना खिरापत, पूजा, प्रसादवाटप आळंदी संस्थानाच्या वतीने होणार आहे.