गौरी लंकेश हत्या: समाजाचा प्रवास अविचारी झुंडीकडे, विविध मान्यवरांचा सूर : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:33 AM2017-09-08T02:33:19+5:302017-09-08T02:33:29+5:30
गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे?
पुणे : गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे? आपला प्रवास समाजाकडून झुंडीकडे होत आहे का? असे अनेक प्रश्न मान्यवरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर उपस्थित केले.
ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे आणि नीलिमा गुंडी या वेळी उपस्थित होत्या. संपादक विजय बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. मनोहर जाधव म्हमाले, लोकशाही व्यवस्थेने प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विचारांचा संघर्ष विचारांनी व्हायला हवा. मात्र, प्रागतिक विचारांचे, विवेकवादी लोक समाजाला शहाणे करण्यासाठी झटत असतात. मात्र, आता त्यांनाच प्राण गमवावे लागत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर येणाºया उन्मादी प्रतिक्रिया आपल्या संस्कृतीला शोभणाºया नाहीत. समाजाची वैचारिक वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, असा प्रश्न पडतो. बोलण्यावर, लिहिण्यावर निर्बंध आणून निर्माण केला जाणारा दहशतवाद मानवी मूल्यांसाठी घातक आहे.
‘गौरी लंकेश यांचा खून झाल्यानंतर तासाभरात त्यांच्या आर्थिक हितसंबंधांसंदर्भात काही व्यक्तींनी व्यक्त व्हायला सुरुवात करणे आश्वर्यकारक होते. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होणेही धोक्याचे बनले आहे. ‘माणूस गेला तरी विचार संपत नाहीत’ असे म्हणणे म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे आहे. या घटनांचा सर्वस्वी दोष राज्य व केंद्रातील गृहमंत्र्यांचा आहे. ते निष्क्रिय आहेत, तोवर कोणालाही शांतपणे जगता येणार नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘समाजात विशिष्ट प्रकारचा उन्माद पाहायला मिळत आहे. वैचारिक दृष्ट्या परिपक्व अशी महाराष्ट्राची विचारवंतांनी तयार केलेली प्रतिमा मलिन होत चालली आहे, हे आपले दुर्दैव. वैचारिक समाजाकडून आपला प्रवास मूल्यहीन, नीतिमत्ताशून्य समूहाकडे, झुंडीकडे होतो आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.