सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 10:11 AM2023-09-07T10:11:43+5:302023-09-07T10:11:59+5:30
कार्यक्रमात गोंधळ झाल्यास मंडळच जबाबादार हमी दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवर गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून ग्रीन सिग्नल
पुणे : दहीहंडी कार्यक्रमासाठी सेलिब्रेेटी आणण्यासाठी विविध मंडळांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. मात्र मंडळांमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे ती गौतमी पाटील हिचीच. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ असे म्हणत बहुतांश मंडळांनी गौतमी पाटील हिचा शो ठेवण्यासाठी गौतमी यांच्याकडे कार्यक्रमाच्या डेट्स मागितल्या आहेत. गौतमी पाटील यांचा आज बुधवारी वारजे येथे कार्यक्रम आहे तर उद्या वाघोली येथे कार्यक्रम आहे तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत त्याचा शो होणार आहे. त्यामुळे तेथून परत इकडे येण्यासाठी अनेकांनी हेलिकॉप्टरमधून गौतमी पाटील यांना आणण्याची तयारी काही मंडळांनी दिल्याची चर्चा वाघोलीत रंगली आहे.
वास्तविक गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हणजे तुफान गर्दी असतेच. त्यात गौतमीच्या अंदावर फुल टू फिदा होणारे प्रेक्षकांकडून अनेकदा हुल्लडबाजी केली जाते, तो राडा नकोच यासाठी पोलिस ठाण्यांकडून अशा शोला परवानगी नाकारली जात असल्याचे चित्र आहेच. मात्र वरिष्ठ पातळीवर पोलिसांकडून परवनगी मागितली जात आहे. त्यावेळी कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक (बाउन्सर), बंदोबस्ताचा खर्च आणि कार्यक्रमात ‘राडा’ झालाच तर त्यालाही मंडळच जबाबादार असेल अशी हमी दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवर गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून मंडळांना ग्रीन सिग्नल दिला जात आहे. या सगळ्यांची जबाबदारी स्वीकारत मंडळ गौतमीसाठी रांगेत उभे आहेत. आज वारजे परिसरात गौतमीचा कार्यक्रमालाही तुफान गर्दी झाली. मात्र कार्यक्रमात हुल्लडबाजी न होता कार्यक्रम सुरळीत पार पडल्याने मंडळाने आणि पोलिसांनी निश्वास सोडला.