डेटिंग ॲपवर समलिंगी हेरायचे अन् पोलिस असल्याचे सांगून लुटायचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 01:08 PM2023-08-23T13:08:52+5:302023-08-23T13:14:53+5:30
ओळख उघड हाेण्याच्या भीतीने दाखल हाेईना तक्रार...
- प्रज्वल रामटेके
पुणे : पुण्यातील अक्षय (नाव बदलले आहे.) ने ‘एलजीबीटीक्यू’ (समलैंगिक) समुदायातील एका डेटिंग ॲपवर एकाबरोबर संवाद साधला. अधिक ओळखीनंतर दोघांनी भेटायचे ठरविले. त्यानुसार ते भेटले; पण पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात व बोलण्यात बदल झाला. “मी पोलिस आहे. सामाजिक सुरक्षा विभागाकडून मी आलो आहे. तू ॲपवरून हे धंदे करतो का? थांब, तुझ्या घरच्यांना सांगतो की तू ‘गे’ आहेस. तुला अटक करून घेऊन जातो.” अशी धमकी दिली. त्यामुळे अक्षय पुरता घाबरला. याचाच गैरफायदा घेत त्याला लुटण्यात आले. असे प्रकार शहरात माेठ्या प्रमाणात वाढले असून, ओळख उघड हाेण्याच्या भीतीने तक्रार देण्यासाठी काेणी पुढे येत नाही.
अक्षय घाबरल्याचे लक्षात येताच त्याने मारहाण केली; तसेच ‘ही केस मिटवायची असेल तर तुला पैसे द्यावे लागतील. पैशांची मागणी मान्य केली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ अशी धमकी दिली. शेवटी घाबरून अक्षयने त्यांना १५ हजार रुपये दिले आणि कशीबशी सुटका करून घेतली; परंतु समोरचा व्यक्ती ना समलिंगी होता ना पोलिस! पैसे उकळण्यासाठी त्याने ‘एलजीबीटीक्यू’ ॲपचा वापर करण्याची ही शक्कल लढविली होती.
ही एक प्रातिनिधिक घटना झाली; परंतु असे प्रकार सध्या डेटिंग ॲपवरून सर्रासपणे होत आहेत. समलैंगिक पुरुष आधीच त्यांच्यातील बदलांनी हैराण झालेले असतात. गुन्हेगारांकडून त्यांना हेरले जाते. समलैंगिक समुदायाच्या सदस्यांना टार्गेट करण्यासाठी डेटिंग ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. खूप कमी प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात; कारण बहुतेक लोक इज्जत जाईल किंवा घरच्यांना कळेल यामुळे गप्प बसतात; अन्यथा अशा समाजविधातक वृत्तींच्या मागणीला बळी पडणे पसंत करतात.
अशी आहे मोड्स ऑपरेंडी :
डेटिंग ॲप्सवर टार्गेट हेरा. त्याला अडकवा, त्यांना भेटण्यासाठी पटवा आणि नंतर पोलिस असल्याचा दावा करून त्यांची ओळख उघड करण्याची धमकी द्या आणि पैसे उकळा... अशा प्रकारे ‘एलजीबीटीक्यू’ समुदायातील लोकांना छळले जाते. यात मानसिक त्रास, आर्थिक हानी अशा गोष्टी हाेत आहेत. यामध्ये पोलिसांमध्ये तक्रार होण्याची शक्यता जवळपास नसते हे माहिती असल्यामुळेच गुन्हेगार मोकाट फिरतात, असे ‘एलजीबीटीक्यू’ समुदायासाठी काम करणाऱ्या ‘युतक संस्थे’चे संस्थापक अनिल उकरंडे यांनी सांगितले.
दुपटीने वाढल्या घटना :
‘युतक संस्थे’कडे २०२२ या वर्षात मदतीसाठी चार फोन आले होते. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये त्यात दुपटीने वाढ झाली असून, या काळात १० पेक्षा जास्त फोन आले आहेत. बऱ्याच प्रकरणांमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांना माहिती नसते. त्यामुळे पीडित घाबरतो. पोलिसांचे नाव सांगितले की, त्याच्यावरचा दबाव आणखी वाढतो. पालकांना कळविण्याची धमकी दिली की, तो लगेचच पैसे द्यायला तयार होतो.
कायदा रद्द; तरीही गैरसमज कायम :
सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक असणे हा कायद्याने गुन्हा असण्याचे कलम ३७७ रद्द केले आहे. याला आता ५ वर्षे झाली आहेत; मात्र या समुदायात असणाऱ्या अनेकांना याची अजून माहितीच नाही. पोलिसही याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच अनेक गैरसमज कायम आहेत. ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबद्दल खुद्द त्यांच्यात, सामान्य नागरिकांमध्ये व पोलिसांमध्येही स्वीकृती नाहीच, शिवाय जागरूकताही नाही.
काय आहे ‘युतक’?
एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांसाठी काम करणारी ही सामाजिक संस्था आहे. ‘युतक’चा अर्थ ‘मैत्रीची नव्याने सुरुवात’ असा आहे. यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संस्थेची कायदेशीर नोंदणी करून घेतली आहे. या समुदायातील लोकांना दिलासा देणे, त्यांना मदत करणे, सामाजिक स्वीकृती मिळवून देणे, याप्रकारचे काम संस्थेचे कार्यकर्ते करतात. मागील काही वर्षात आर्थिक छळवणुकीचे प्रकार वाढले आहेत, पोलिस याकडे लक्षच देत नाहीत. त्यामुळे अशा गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे संस्थेतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
डेटिंग ॲप म्हणजे काय?
हे समलैंगिक समुदायातील लोकांसाठीचे एक स्वतंत्र ॲप्लिकेशन आहे. ते मोबाइलवर डाऊनलोड करून घेता येतो. दुसऱ्या समलैंगिक व्यक्तीबरोबर संपर्क साधण्यासाठी याचा वापर केला जातो. याच ॲप्लिकेशनचा वापर करून काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक समलैंगिक असल्याचे भासवून अशा लोकांची आर्थिक पिळवणूक करतात.
का होत नाहीत पोलिस तक्रारी?
झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी अक्षय नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये गेला. तिथे त्याने झालेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. परंतु पोलिसांनी त्याची मदत करायची सोडून त्याचीच मस्करी करण्यास सुरुवात केली. त्याला हसत तुमच्यासारख्या लोकांमुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे. तुम्ही लोक असे कसे? या शब्दात त्याचे मानसिक खच्चीकरण केले. बहुतांश घटनांमध्ये पोलिसांकडून अशीच वागणूक मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळेही तक्रारदार पोलिस ठाण्यात जाण्याचे टाळतात.
पोलिसच कायद्याविषयी अनभिज्ञ
एलजीबीटीक्यू समुदाय विरोधात वाढलेले गुन्हे आणि त्यावरती काय उपाय करता येईल, यासाठी जून महिन्यात युतक संस्थेने अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यांच्याशी चर्चा करताना कर्णिक स्वतः म्हणाले की, याबाबत पोलिस खात्यामध्ये जागरूकता वाढवण्याची गरज आहे. यामुळे पोलिस प्रशासनामध्ये जागृती व माहितीपर कार्यशाळा राबवायचे असल्यास आम्ही ते करू, असे आश्वासन युतकच्या वतीने देण्यात आले.
समलिंगी, उभयलिंगी व तृतीयपंथी (एलजीबीटीक्यू) व्यक्तींकडून धमकावून पैसे उकळणे, मारहाण करणे अशा गुन्ह्यांचे शहरातील प्रमाण मागील काही वर्षांत वाढले आहे. यात डेटिंग ॲपचा वापर केला जातो. निम्म्यापेक्षा जास्त गुन्हे आरोपींनी, ‘आम्ही पोलिस आहोत’ असे भासवून केलेले आहेत. अशा लोकांवर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे; तसेच पोलिस ठाण्यांमध्ये एलजीबीटीक्यू तक्रारदाराला अतिशय तुच्छ वागणूक दिली जात असल्याने ‘आगीतून फुफाट्यात’ अशी वेळ त्यांच्यावर येते व तक्रारदार माघार घेतो. यासाठी संवेदनशील पोलिस यंत्रणा उभी करावी, अशी आमची मागणी आहे.
- अनिल उकरंडे, एलजीबीटीक्यू कार्यकर्ते व अध्यक्ष, युतक ट्रस्ट