GBS Disease : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल, पण पाण्याची तपासणी न करताच परतलं;नागरिक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:51 IST2025-01-29T12:50:42+5:302025-01-29T12:51:06+5:30
आरोग्य पथकाकडे विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली. मात्र, कोणतीही तपासणी न करता पथक

GBS Disease : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल, पण पाण्याची तपासणी न करताच परतलं;नागरिक आक्रमक
पुणे : शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल झाले. मात्र, नांदेड भागातील विहिरी आणि पाण्याची तपासणी न करताच पथक परत गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ‘जीबीएस’ रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही स्थानिकांनी या आजाराचा आणि पाणीप्रदूषणाचा संबंध असण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे त्यांनी आरोग्य पथकाकडे विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली. मात्र, कोणतीही तपासणी न करता पथक निघून गेल्याने नागरिक आक्रमक झाले.
दरम्यान, स्थानिकांनी पथकाची गाडी अडवल्यानंतरच त्यांनी पाण्याची पाहणी केली. नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने सर्व जलस्रोतांची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी महापालिका आणि आरोग्य विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
जीबीएस म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती?
जीबीएस ही एक दुर्मीळ परंतु उपचार करण्यायोग्य न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मज्जातंतूंवर हल्ला होतो. ज्यामुळे मान, चेहरा आणि डोळ्यांमध्ये अशक्तपणा येणे, मुंग्या येणे किंवा सुन्न होणे, गंभीर प्रकरणांमध्ये चालायला त्रास होणे, अन्न पदार्थ गिळता न येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने जीबीएसमध्ये दिसतात.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची प्रमुख लक्षणे
- पाय किंवा हातांमध्ये अचानक अशक्तपणा.
- चालण्यात अडचण किंवा बधिरपणा.
- सतत अतिसार, विशेषत: रक्तरंजित असल्यास.
काय आहेत मार्गदर्शक सूचना
- पिण्यापूर्वी पाणी उकळून घ्या.
- पाण्याच्या सुरक्षिततेबाबत खात्री नसल्यास बाटलीबंद पाणी वापरा.
- भाज्या आणि फळे चांगले धुवा.
- पोल्ट्री आणि मांस योग्य प्रकारे शिजवा
- कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, विशेषतः अंडी आणि सीफूड टाळा.
- जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात धुवा.
- बाहेरील अस्वच्छ बाबी हाताळताना काळजी घ्या.