‘जीबीएस’चा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे; ‘एनआयव्ही’चा प्राथमिक निष्कर्ष, पाण्याच्या निर्जुंतिकीकरणावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:49 IST2025-04-21T11:48:53+5:302025-04-21T11:49:56+5:30
जीबीएस हा ८ ते ९ प्रकारच्या संसर्गांमुळे होत असून ५० टक्के प्रकरणांमध्ये तो नेमका कशामुळे उद्भवला हे लवकर सापडत नाही

‘जीबीएस’चा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे; ‘एनआयव्ही’चा प्राथमिक निष्कर्ष, पाण्याच्या निर्जुंतिकीकरणावर प्रश्नचिन्ह
पुणे: शहरात जानेवारी महिन्यात उद्भवलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने काढला आहे. या निष्कर्षामुळे पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धिकरण व क्लोरिनेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू असून, लवकरच त्याचे अंतिम निष्कर्ष हाती येईल, अशी माहिती राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. नवीन कुमार यांनी दिली.
शहरात जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. ९ जानेवारीपासून जीबीएस या आजाराचा उद्रेक झाला होता. सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव होता. शहरात जीबीएसचे २०२ रुग्ण आढळले होते. यात पुणे महापालिका हद्दीत ४६, नव्याने समाविष्ट गावांमध्ये ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ३४, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४० अशी रुग्णसंख्या होती. जीबीएसमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याने त्याचे गांभीर्य वाढले होते. जीबीएस उद्रेक झालेल्या भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण न आढळल्याने पुण्यातील जीबीएसचा प्रादुर्भाव संपल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. मात्र, या उद्रेकाचे नेमके कारण आरोग्य विभागाने अद्याप जाहीर केलेले नाही. आता ‘एनआयव्ही’च्या प्राथमिक निष्कर्षामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्राथमिक निष्कर्षावर बोलताना डॉ. नवीन कुमार म्हणाले की, जीबीएस हा ८ ते ९ प्रकारच्या संसर्गांमुळे होतो. त्यातही ५० टक्के प्रकरणांमध्ये तो नेमका कशामुळे उद्भवला हे सापडत नाही. त्यामुळे आम्ही जीबीएस उद्रेकावेळी त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सर्व जीवाणू आणि विषाणूंची तपासणी सुरू केली. सुमारे २६ प्रकारच्या रोगकारक घटकांची तपासणी केली. तीनशेहून अधिक नमुन्यांच्या तपासणीत प्रामुख्याने नोरोव्हायरस आणि कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आढळून आले. नोरोव्हायरसमुळे जीबीएसचा प्रादुर्भाव होत नाही, म्हणून कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी संसर्गावर लक्ष केंद्रित केले. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांच्या घरातील नळाच्या पाण्यामध्ये तो आढळला. हा पाणीपुरवठा खडकवासला धरणातून होत होता. खडकवासला धरणाच्या परिसरात अनेक कुक्कुटपालन केंद्रे असल्याने तेथील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने आम्ही तपासले. त्यातील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा जीवाणू आढळून आला. त्यामुळे जीबीएसचा उद्रेक कोंबड्यांमुळे झाल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. याबाबत संशोधन सुरू असून, लवकरच अंतिम निष्कर्ष येईल, असेही डॉ. कुमार यांनी सांगितले.
महापालिकेच्या पाणी निर्जंतुकीकरणावर प्रश्नचिन्ह
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड गावातील विहिरीत खडकवासला धरणातील पाणी सोडले जात होते. तिथे पाणी निर्जंतुकीकरणासाठी क्लोरिनेशनची प्रक्रिया पुणे महापालिकेकडून केली जात होती. या निर्जंतुकीकरण व क्लोरिनेशन प्रक्रियेवर डॉ. कुमार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, क्लोरिनेशनची प्रक्रिया एक तर योग्य पद्धतीने सुरू नव्हती अथवा महापालिकेकडून प्रक्रिया सुरू होती, परंतु त्यात काही दोष होते. त्यामुळेच पाण्याचे पूर्ण निर्जंतुकीकरण होऊ शकले नाही.