जन्मशताब्दीवर्षात तरी पूर्ण होणार का गदिमांचे स्मारक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:51 PM2018-05-23T15:51:57+5:302018-05-23T15:51:57+5:30
आपल्या अलौकिक कर्तृत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाङ्मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न या जन्मशताब्दी वर्षात तरी सुटणार का ? असा खडा सवाल माडगूळकर कुटुंबियांतर्फे विचारण्यात येत आहे
पुणे: गेल्या दहा बारा वर्षांपासून गदिमांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. आजमितीला तब्बल दोन कोटी रूपये खर्च करून केवळ सीमाभिंतीच उभ्या राहिल्या आहेत. इतक्या वर्षात स्मारकाची एक वीटही उभारली जाऊ नये. गदिमांचे कार्यक्षेत्र असणा-या महानगरपालिकेला त्यांच्या स्मारकाचे वावडे आहे का? यंदाच्या वर्षी गदिमांच्या जन्मशताब्दीवर्षाला प्रारंभ होत आहे. स्मारकाच्या कामाला मुहूर्त लागत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार का? असा सवाल माडगूळकर कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे.
आपल्या अलौकिक कर्तृत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाङ्मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. गदिमा आणि बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून ‘गीतरामायण’ हे महाकाव्य साकार झाले. तरीही महानगरपालिकेला त्यांचे यथोचित स्मारक करता येऊ नये? अनेक नेते, राजकारणी मंडळी यांची स्मारके होतात मग गदिमांच्या स्मारकाबाबतच इतकी उदासीनता का? असा प्रश्न गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
पुणे महानगरपालिकेने बारा वर्षांपूर्वी पुणे-मुंबई रस्त्यालगत वाकडेवाडीजवळ मुळा नदीकाठची माधवराव शिंदे उद्यानालगतची जमीन स्मारकासाठी निश्चित केली होती. स्मारकासाठी महानगरपालिकेने ३ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. पुरापासून रक्षण म्हणून सीमाभिंत बांधण्यापलीकडे स्मारकाची एकही वीट एवढ्या वर्षात उभी राहिली नाही. ही जमीन बांधकाम नियमावलीच्या विविध बेल्ट (नदीकाठी आहे) मध्ये येत असल्याने इथे बांधकाम करता येणे शक्यही नाही. परंतु इतक्या वर्षात महानगरपालिकेला दुसरी जागा देखील शोधता आली नाही. २००७ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात ‘गदिमांचे पुणे येथे स्मारक करु’असे नमूद केले होते. सत्ता स्थापनेनंतर मात्र, गदिमांच्या स्मारकाचा विसर पडला. 20१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला प्रथमच सत्तास्थापनेची संधी मिळाली. महापौर मुक्ता टिळक आपल्या कार्यकाळात गदिमांच्या स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. यापूर्वीही गदिमांचे स्मारक लवकर व्हावे अशी मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. तसेच जुळे-सोलापूर सारख्या अनेक म.सा.प च्या शाखांनीही मागणी केली आहे. माझ्यासह सुनील महाजन , प्रवीण वाळिंबे यांनी माजी उपमहापौर अलगुडे, तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना भेटून याबाबतीत निवेदन दिले होते. आता सौरभ राव हे महानगरपालिका आयुक्त असल्याने त्यांनी स्मारकात लक्ष घालावे. येत्या १ आॅक्टोबर रोजी गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे .त्यांचे स्मारक करणे जर पुणे महानगरपालिकेला जमत नसेल तर महाराष्ट्र सरकारने ते ताब्यात घ्यावे व स्वत: करावे,असे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------------------------आम्ही गदिमांच्या सर्व गोष्टी संकेतस्थळाच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात जतन केल्या आहेत. मात्र त्यांचे संग्रहालयरूपी स्मारक व्हावे अशी आमची इच्छा आहे. गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मारकाचे रखडलेले काम सुरू व्हावे, हीच महापालिकेने त्यांना श्रद्धांजली द्यावी- सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू
----------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेला ‘गीतरामायण एक्स्प्रेस’ नाव द्यावे
गदिमांबरोबरच यंदाच्या वर्षी स्वरतीर्थ सुधीर फडके यांचेही जन्मशताब्दी वर्ष आहे. गुरू रविंद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली एक्सप्रेस' च्या धर्तीवर जर पुणे-मुंबई मार्गावरच्या एखाद्या रेल्वेला 'गीतरामायण एक्सप्रेस' नाव देता आले तर या दोघांना व 'गीतरामायण' महाकाव्याला ही एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली ठरेल! महाराष्ट्र सरकारने यासाठीही पुढाकार घ्यावा अशी मागणीही सुमित्र गाडगूळकर यांनी केली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
दोन वर्षांपूर्वी सौरभ राव हे जिल्हाधिकारी असताना त्यांना आम्ही निवेदन दिले होते. इतक्या वर्षात गदिमांचे स्मारक न होणे हेच दुर्दैव आहे. यंदाच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाल्यास रसिकांना आनंद मिळेल- सुनील महाजन, अध्यक्ष कोथरूड नाट्य परिषद