गीतरामायण महाराष्ट्र विसरणार नाही - राजदत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 02:39 AM2017-09-13T02:39:48+5:302017-09-13T02:39:48+5:30
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या काव्यरचना म्हणजे दैवी देणगी आहे. त्यांच्या कविता व गीतरामायण महाराष्ट्र विसरू शकत नाही. चित्रपटसृष्टीत काम करीत असताना साहित्याची झालर सांभाळावी लागत असल्याने पहिल्यापासूनच साहित्याचे आकर्षण होते. मी ग. दि. माडगूळकरांच्या वैचारिक तालमीत वाढलो असून, त्यांच्याच नावाने जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना देहाचे मंदिर झाल्याची भावना मनात येत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी मंगळवारी येथे केले.
भोसरी : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या काव्यरचना म्हणजे दैवी देणगी आहे. त्यांच्या कविता व गीतरामायण महाराष्ट्र विसरू शकत नाही. चित्रपटसृष्टीत काम करीत असताना साहित्याची झालर सांभाळावी लागत असल्याने पहिल्यापासूनच साहित्याचे आकर्षण होते. मी ग. दि. माडगूळकरांच्या वैचारिक तालमीत वाढलो असून, त्यांच्याच नावाने जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना देहाचे मंदिर झाल्याची भावना मनात येत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी मंगळवारी येथे केले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने २४व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव पार पडला. या महोत्सवात राजदत्त यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना गदिमा चित्रमहर्षी पुरस्कार, प्रसिद्ध लोककलावंत रेश्मा मुसळे यांना गदिमा लोककला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते कविता महोत्सवाचे उद्घाटन झाले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी स्वागत केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल गिरीश मालपाणी उपस्थित होते.
या वेळी सुशीलकुमार शिंदे यांचा ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’, अरुण इंगवले यांचा ‘आबूट घेºयातला सूर्य’ सागर काकडे यांचा ‘माणसाच्या सोईचा देव’, कविता शिर्के-कडलक यांचा ‘बाईपणाची जमीन’ या कवितासंग्रहांचा गदिमा साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या भारतरत्न या पुस्तकास मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिले.
भोसरीतील संत साई इंग्लिश मीडिअम स्कूल व इंद्रायणीनगर येथील श्री टागोर माध्यमिक विद्यालयास गदिमा संस्कारक्षम शाळा हा सन्मान दिला. ग्राफ फायर इंडस्ट्रीजचे गजानन चरपे व प्रगती इंजिनिअरिंगचे लक्ष्मण काळे यांना महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
विठ्ठल वाघ : कवी मानवतावादी असतो
ग. दि. माडगूळकरांच्या स्मृती जपणे सोपे काम नाही. गदिमांच्या स्मृती जपणाºया कवींचा आपल्याला अभिमान वाटतो, असे सांगत प्रा. मिलिंद जोशी यांनी गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्याला आलेल्या जीवनानुभवातून कवितेचा उगम होतो. कवी हे समाजाचे विदारक चित्र कवितेच्या माध्यमातून समाजाला रुचेल त्या भाषेत मांडत असतात. गदिमांचा वारसा चालवणे अवघड गोष्ट आहे. गदिमांचा प्रत्येक शब्द पुढच्या पिढ्यांसाठी भक्कम पाठीराखा आहे, असे डॉ. रामचंद्र देखणे यांनी सांगितले. या वेळी मेघराज राजेभोसले, भाऊसाहेब भोईर यांनीही विचार मांडले.
डॉ. विठ्ठल वाघ यांनी अध्यक्षीय भाषणात कवी कोणत्या विशिष्ट जातीचा नसतो आणि कवीला कोणता धर्मही नसतो. निर्गुण निराकार ईश्वराचा अंश हा कवी असून, जे वास्तव आहे ते त्याच्या कवितेतून येते. कवी केवळ मानवतावादी असतो. त्याच्याकडे निस्सीम माणुसकी असते आणि त्या माणुसकीत कोणत्याही जाती अथवा धर्माला थारा नसतो. आपल्या ‘वेदान्त’ व ‘नर्तन’ या दोन कवितांचे सादरीकरणही त्यांनी या वेळी केले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.