गीतरामायणाला ‘मेघराजा’ची साथ

By Admin | Published: March 29, 2015 12:25 AM2015-03-29T00:25:15+5:302015-03-29T00:25:15+5:30

गीतरामायण’ हा एक अनमोल ठेवा आहे.. त्याचे श्रवण करण्याची संधी रामनवमीच्या दिवशी मिळणे ही तर रसिकांसाठी परमभाग्याची गोष्ट...

Geetaramayana with 'Meghrajaja' | गीतरामायणाला ‘मेघराजा’ची साथ

गीतरामायणाला ‘मेघराजा’ची साथ

googlenewsNext

पुणे : ‘गीतरामायण’ हा एक अनमोल ठेवा आहे.. त्याचे श्रवण करण्याची संधी रामनवमीच्या दिवशी मिळणे ही तर रसिकांसाठी परमभाग्याची गोष्ट... श्रीराम आणि भक्ताच्या या भेटीचा योग कदाचित मेघराजालाही चुकवू द्यायचा नव्हता... म्हणूनच पावसाच्या शिडकाव्यात छत्री उघडूनही गीतरामायणाचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांच्या आनंदात विरजण पडू न देता ‘त्याने’ही बरसणाऱ्या सरींना काही काळ रोखले... आणि या अजरामर कलाकृतीला मेघराजाने जणू अनोखी मानवंदना शनिवारी दिली.
अचानक सायंकाळी आकाशात मेघ दाटून आले आणि पावसाचा शिडकावा सुरू झाला... कार्यक्रम पुढे ढकलला जाईल असे वाटत असताना रसिक छत्र्या उघडून कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी खुर्च्यांवर ‘जैसे थे’ बसून होते. रसिकांचा हा उत्साह पाहून आयोजकांनीही कार्यक्रम पावसाच्या रिमझिमीमध्येही सुरू ठेवला. गीतरामायणातील ‘स्वरधारा’मध्ये चिंब झालेल्या हजारो रसिकांच्या उपस्थितीत गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याची सांगता झाली. सुरुवातीला बरसलेल्या पर्जन्यधारा आणि त्यानंतर गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुमधुर स्वरातून प्रकटलेल्या गीतांनी.
प्रारंभी रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते या हीरकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘ज्योतीने तेजाची आरती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर या वेळी गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रवींद्र वंझारवाडकर, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, श्रीधर माडगूळकर, धनंजय कुलकर्णी, पृथ्वी एडिफीसचे अभय केले, योगेश चांदोरकर उपस्थित होते.
भय्याजी जोशी म्हणाले, गीतरामायणाचा हीरकमहोत्सवी सोहळा पुण्यात होत आहे हे पुणेकरांचे भाग्य आहे कारण गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर यांच्यात भक्तिभाव जागृत करण्याची अद्भूत किमया आहे. स्वत: श्रीधर फडके यांनीही बाबूजींची किमया त्याच ताकदीने जिवंत ठेवली. गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर म्हणाले, की गीतरामायणाचे आणि सर्वसामान्यांच्या जीवनाचे नाते इतके अतूट आहे, की गीतरामायण कितीही ऐकले तरी त्याची अवीट गोडी संपणारी नाही.
(प्रतिनिधी)

४मधुकर सिधये यांच्या शंखवादनाने स्वरमैफलीस प्रारंभ झाला. त्यानंतर कोल्हापूरच्या डॉ. भाग्यश्री मुळे यांनी गुजराती गीतरामायणातील ‘विदाय शाने मारी लेता, ज्यां राघव त्यां साथे सीता’ आणि ‘हरण लावी द्यो मने अयोध्यानाथा’ ही दोन गाणी म्हटली. या वेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या गुजराती गाण्यांचे स्वागत केले. ही गाणी हंसराज ठक्कर यांनी गुजराती भाषेत अनुवादित केली आहेत.
४त्यानंतर मुख्य कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी, ‘सेतू बांधा रे’, ‘सुग्रीवा साहस हे भलते’, ‘शेवटचा करी विचार’, ‘आज का निष्फळ होती बाण’, ‘लीनते चारुते सीते’, ‘स्वामिनी निरंतर माझी’, ‘त्रिवार जयजयकार’, ‘प्रभो मज एकाच वर द्या’, ‘मज सांग लक्ष्मणा’ आणि ‘गा बाळांनो’ ही गाणी म्हणून रसिकांची मने जिंकली. गीतरामायणाचे रसाळ निवेदन धनश्री लेले यांनी केले.

Web Title: Geetaramayana with 'Meghrajaja'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.