जिलेटिन स्फोटप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By Admin | Published: April 15, 2016 03:31 AM2016-04-15T03:31:49+5:302016-04-15T03:31:49+5:30
सुरवड जिलेटिन स्फोटप्रकरणी निष्काळजीपणा करून दोन कामगारांच्या मृत्यूस व तिघां जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत विहिरीचा गाळ काढणारा
इंदापूर : सुरवड जिलेटिन स्फोटप्रकरणी निष्काळजीपणा करून दोन कामगारांच्या मृत्यूस व तिघां जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत विहिरीचा गाळ काढणारा ठेकेदार व स्फोट घडवून आणणारा इसम या दोघांवर इंदापूर पोलिसांनी काल (दि.१४) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
हरिभाऊ शंकर शिंदे (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर),महेंद्र भीमराव पानसरे (रा.लाखेवाडी,ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सुरवड गावच्या हद्दीत गायरान जमीन गट क्रमांक २५८मधील भैरवनाथ मंदिराच्या शेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर आहे. ५० फूट खोल,२५ फूट व्यासाच्या या विहिरीचे पाणी कमी झाल्याने हरिभाऊ शिंदे या ठेकेदाराकडे विहिरीतील गाळ काढण्याचे काम दिले होते. विहीरीवर जिलेटिन उडविण्यासाठी छिद्र घेण्याचे काम संदीप बलभीम शिंदे (रा.शेटफळ हवेली, ता. इंदापूर) याच्याकडे देण्यात आले होते. जिलेटिनचा स्फोट करण्याची जबाबदारी महेंद्र भीमराव पानसरे याच्यावर सोपवली होती.
सोमवारी (दि.११) संदीप शिंदे याने विहिरीमध्ये ३० छिद्रे पाडली. दुसऱ्या दिवशी बारा वाजता हरिभाऊ शिंदे व महेंद्र पानसरे यांनी विहिरीत जिलेटिनचे स्फोट घडवून आणले. मात्र सर्व छिद्रांमधील जिलेटिनचा स्फोट झाला की नाही, याची खात्री न करता हे दोघे जण निघून गेले. काल (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कांतिलाल नरहरी शिंदे (वय ५० वर्षे,रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), कृष्णा ऊर्फ बाबा महादेव भोसले (वय ५० वर्षे, रा. भांडगाव, ता. इंदापूर), महादेव मच्छिंद्र पताळे (वय ४०वर्षे), मारुती रामचंद्र चौगुले (वय ४५ वर्षे), नितीन वामन शिंदे (वय ३३ वर्षे, सर्व रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) हे सर्व कामगार काम करण्यासाठी विहिरीत उतरल्यानंतर, विहिरीतील छिद्रात अर्धवट राहिलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन दुर्घटना घडली.
त्यामध्ये कृष्णा ऊर्फ बाबा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर कांतिलाल शिंदे यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू असताना ते
मरण पावले. महादेव मच्छिंद्र पताळे (वय ४० वर्षे), मारुती रामकृष्ण चौगुले (वय ४५), नितीन वामन शिंदे (वय ३३, सर्व रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) यांच्यावर अकलूज (ता. माळशिरस,जि. सोलापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.