आरक्षित डबा की जनरल बोगी?
By admin | Published: September 12, 2016 02:36 AM2016-09-12T02:36:37+5:302016-09-12T02:36:37+5:30
ख्खनची शान अशी ख्याती असलेल्या डेक्कन क्वीनने आरामशीर प्रवास करण्यास मुंबई, पुणेकरांची नेहमीच पसंती असते़ त्यासाठी अनेक जण २ - २ महिने आधी आरक्षण करतात़
पुणे : दख्खनची शान अशी ख्याती असलेल्या डेक्कन क्वीनने आरामशीर प्रवास करण्यास मुंबई, पुणेकरांची नेहमीच पसंती असते़ त्यासाठी अनेक जण २ - २ महिने आधी आरक्षण करतात़ मात्र, रविवारी डेक्कन क्वीनमधून प्रवास करणाऱ्यांना आपण आरक्षित डब्यातून प्रवास करतो की जनरल डब्यातून, हेच समजत नव्हते़ इतकी प्रचंड गर्दी आरक्षित डब्यामध्ये होती़
माहीमचा माऊंट मेरी चर्चचा उत्सव आणि गणेशोत्सव यामुळे ही गर्दी असल्याचे सांगण्यात आले़ आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास रेल्वे विनातिकीट असल्याचे समजून त्या प्रवाशाकडून दंडासह संपूर्ण तिकिटाचे पैसे वसूल करते़ पण, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी रेल्वेमध्ये बहुधा या नियमाची अंमलबजावणी करण्यास ते विसरत असावेत, असे या गर्दीवरून वाटत होते़
माहीमच्या माऊंट मेरी चर्चचा उत्सव असल्याने असंख्य पुणेकर या उत्सवाला उपस्थित राहिले होते़ त्याचबरोबर पुण्याच्या गणेशोत्सवातील देखावे मुंबईकरांना नेहमीच आकर्षित करीत आले आहेत़ हे देखावे पाहण्यासाठी रविवारी मोठ्या प्रमाणावर डेक्कन क्वीनला गर्दी झाली होती़
याबाबत प्रवासी रेल्वे ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले, की रेल्वेकडून आरक्षण पूर्ण झाले तरी मोठ्या प्रमाणावर वेटिंग तिकीट दिली जातात़ त्यामुळे असंख्य प्रवाशांचे तिकीट शेवटपर्यंत कन्फर्म होत नाही़ त्यांच्याकडून प्लॅटफॉर्मवरच तिकिटातील फरकाची रक्कम घेतली जाऊन त्यांना डब्यात बसायला सांगितले जाते़