बारामती नगरपालिका सर्वसाधारण सभा : अभियंत्यांची पोलखोल; मुख्याधिकारी निरुत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:30 AM2018-04-03T03:30:42+5:302018-04-03T03:30:42+5:30

 General Meeting of Baramati Municipal Council: Policeman of Engineers; Chief Officer Nirrat | बारामती नगरपालिका सर्वसाधारण सभा : अभियंत्यांची पोलखोल; मुख्याधिकारी निरुत्तर

बारामती नगरपालिका सर्वसाधारण सभा : अभियंत्यांची पोलखोल; मुख्याधिकारी निरुत्तर

googlenewsNext

बारामती - बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल करताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. विकासकामासाठी मुदतवाढीच्या विषयावर नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. मुदतवाढीच्या कामांचा चार्ट पाहून नगरसेवकांसह संपूर्ण सभागृह चाट पडले. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामांना विरोध करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचे नगरसेवकांनी वाभाडे काढले. बांधकाम विभागप्रमुख अभियंत्याने दिलेल्या चार्टमध्ये बनावटपणा आढळल्याने मुख्याधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.
याबाबत अनभिज्ञ असलेल्या नगराध्यक्षांनी या संबंधित विषयाचे अधिकारी गैरहजर असल्याने विषय तहकूब ठेवत याची चौकशी करून पुढील सर्वसाधारण सभेपुढे विषय ठेवला जाईल, असा ठराव मंजूर केला. विकासकामांच्या विविध १८ विषयांना या वेळी मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली, विविध १९ विषयांसाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, मुख्याधिकारी मंगेश चिताळे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. विविध ११ विषयांना मंजुरी देण्यात आल्यानंतर नगर परिषदेकडील चालू असलेल्या विकासकामांसाठी मुदतवाढ देण्याचा विषय समोर आला. मुदतावाढीच्या कामासंदर्भातील हाती असलेल्या चार्टची पोलखोल या वेळी नगरसेवकांनी केली. ज्या ठिकाणचे रस्ते पूर्ण आहेत, अशा ठिकाणी मुदतवाढ मागण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू होण्याआधीच मुदतवाढ मागणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या कामात अशा प्रकारचा घोळ करण्यात आला असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केला. या संबंधित असलेले अभियंत्यास सर्वसाधारण सभेत उत्तरे द्यावी लागतील, या भीतीनेच गैरहजर असल्याचा आरोप त्यांनी केला. या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. ठेकेदाराचे लाड पुरवले जात आहेत. एखाद्या प्रभागातील काम अडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. हे सगळे होत असताना प्रशासन झोपले आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
नगरसेवक संजय संघवी यांनी सदस्यांना याबाबत खोटी माहिती दिली जात आहे. जाणिवपूर्वक असे होत असेल तर ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक जय पाटील यांनी त्या अभियंत्यावर करवाईचा ठराव करण्याची मागणी केली. अभियंता व ठेकेदार यांचे संगनमत असल्याचा आरोप नगरसेवक अमर धुमाळ यांनी केला. विकासाचा समतोल साधला जात नाही. तोंडे पाहून काम केले जाते, असे नवनाथ बल्लाळ यांनी सुनावले. नगरसेवक सूरज सातव, तसेच गणेश सोनवणे यांनी रस्त्यांच्या विषयावर, तसेच वेगवेगळ्या विषयांवर मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. पुढील सर्वसाधारण सभेपुढे हा विषय आणला जाईल, असा विश्वास मुख्याधिकारी चितळे यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करणे, बृहन्बारामती पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट कामातील टप्पा क्रमांक १ या कामास मान्यता, मंडई वाहनतळ भाडेतत्त्वावर चालविण्यास निविदा प्रक्रिया राबवणे, गुलपुनावाला तो गार्डनलगताचा सेवा रस्त्याबाबतच्या निर्णयासह आदी विषयांना या वेळी मंजुरी देण्यात आली.

शहरातील बहुमजली वाहनतळ भाडेतत्त्वावर चालविण्यास निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या काही महिन्यांत वाहनतळ नागरिकांसाठी खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला. असे असले तरी याबाबत ठेकेदाराकडून राहीलेल्या उर्वरित कामाबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

नगर परिषेदेने विकसित केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम खेळांडूसाठी खुले करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. त्यासाठी क्रिकेट अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याबाबत असलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. नगर परिषेदेने घातलेल्या अटींमुळे स्थानिक खेळाडूंना कदाचित वंचित राहावे लागेल, असे निवेदन मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांना देत आमराई विभागातील काही खेळाडूंनी आज आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान त्यांनी नगर परिषदेच्या दारातच क्रिकेटचा खेळ सुरू केला.

Web Title:  General Meeting of Baramati Municipal Council: Policeman of Engineers; Chief Officer Nirrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे