सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेतली; पुणे महापौरांच्या दालनात विरोधकांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:47 PM2021-02-08T18:47:29+5:302021-02-08T18:47:55+5:30
Pune municipal Politics : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटला होता. सत्ताधारी भाजप विरोधकांची गळचेपी करण्यासाठीच सर्वसाधारण सभा होवु देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत होते.
राज्यशासनाची परवानगी आलेली असुनही महापालिकेची सभा ॲानलाईन घेतल्याचा निषेध करत पुणे महापालिकेत विरोधकांनी आज ठिय्या आंदोलन केले. सत्ताधारी भाजप मुस्कटदाबी करत भ्रष्टाचार रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र फक्त पुण्यातच परवानगी का? मुंबई महापालिकेची सभा का चालवत नाही असा प्रश्न विचारला आहे.
पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्याची परवानगी राज्य शासनाने अखेर दिली आहे. मात्र, आजची सभा प्रभाग समिती मधून व्हिडीओ कॅान्फरन्सिंग द्वारे घेण्याचा निर्णय आधीच जाहीर झाल्या असल्याने नगरसेवकांना जवळपास वर्षभरानंतरही महापालिकेच्या सभेला सभागृहात हजर राहण्याची संधी मिळाली नाही. याचाच निषेध करत विरोधी पक्षातल्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात ठिय्या मांडत निषेध केला.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटला होता. सत्ताधारी भाजप विरोधकांची गळचेपी करण्यासाठीच सर्वसाधारण सभा होवु देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत होते. तर सभा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सत्तेत असलेल्या राज्य सरकारने घेतला आहे। आम्ही त्यांना विनंती करुनही त्यांच्याकडुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला होता.
याबाबत नुकताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. पवार सकारात्मक असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांची केल्यानंतरही महापौरांनी मात्र अधिक्ृत पत्र आल्यावरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. अखेर राज्य शासनाने महापालिका आयुक्तांचे कोरोनाचे नियम पाळत सभेला परवानगी दिली.
पण यापुर्वीच व्हिडीओ कॅान्फरंसींगचा निर्णय झाला असल्याने आज प्रभाग समित्यांमधुनच व्हिडीओ काॅन्फरंन्सींग द्वारे सभा घेण्याचा निर्णय झाला. पण यावरुनच गोंधळ घालत विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं. भ्रष्टाचार करत निर्णय रेटायचे असल्यानेच सत्ताधारी सभा होवु देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला.
तर विरोधकांचे वर्तन बेजबाबदार पणाचे आहे असं म्हणत नगरविकास खात्याने फक्त पुण्यासाठीच आदेश कसा काय काढला असा प्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारला. “ सभा घ्यायचीच तर मुंबईसह इतर महापालिकांची का घेतली जात नाही? मुॅबईची सभा चालवु देत नाहीत मग फक्त पुण्यासाठीच आदेश का निघतो ?” असं मोहोळ म्हणाले.