पुण्यासह चार शहरांत होणार कोरोनाचा जनुकीय अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:17+5:302021-06-11T04:09:17+5:30
तज्ज्ञांची माहिती : देशातील २० प्रयोगशाळांमध्ये अभ्यास रॉकफेलर फाउंडेशनचे अर्थसाहाय्य : हैदराबाद, बंगळुरू, दिल्लीतल्याही संस्था पुणे : कोविड-१९ विषाणूच्या ...
तज्ज्ञांची माहिती : देशातील २० प्रयोगशाळांमध्ये अभ्यास
रॉकफेलर फाउंडेशनचे अर्थसाहाय्य : हैदराबाद, बंगळुरू, दिल्लीतल्याही संस्था
पुणे : कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय संरचनेत सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या नमुन्यांचा (व्हेरियंट) अभ्यास करण्यासाठी विषाणुचा जनुकीय क्रम तपासला जाणार आहे. कोणता ‘व्हेरियंट’ जास्त धोकादायक ठरू शकतो, त्यावर लसीचा परिणाम काय होतो, प्रसाराचा वेग किती हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनच्या अर्थसाहाय्यातून पुण्यासह हैदराबाद, बंगळुरू, दिल्लीतल्या संशोधन संस्था या अभ्यासात सहभागी होणार आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि आयआयएसईआर या दोन्हीसह देशातल्या २० संस्थांचा यात समावेश आहे. या २० संस्थांमध्ये देशभरातील प्रातिनिधिक ‘व्हेरियंट्स’चा अभ्यास होईल.
एमआरएनएच्या सिक्वेन्सचा अभ्यास जनुकीय क्रमात केला जातो. सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान आणि सर्व्हेलन्स म्हणजे तंत्रज्ञानाचे सर्वेक्षण. कोविड-१९ चे बदलते व्हेरियंटची संख्या याच्या वेगवान अभ्यासाची गरज लक्षात आल्याने जीनोम सर्व्हेलन्सच्या प्रक्रियेला आणखी वेग येणार आहे. यामुळे लसींची परिणामकारकता कमी होत आहे का आणि होत असल्यास त्यात कोणते बदल करावे लागतील, तिसरी लाट रोखण्यासाठी काय पावले उचलावी लागतील, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.
चौकट
“गेल्या दीड वर्षात झपाट्याने विषाणूमध्ये म्युटेशन झाले. काही व्हेरियंट मोजक्या रुग्णांमध्ये दिसतात आणि निघून जातात. काही व्हेरियंट जास्त काळ टिकतात आणि धोका निर्माण करतात. व्हेरियंटमुळे लसीची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता असते. सध्याचा डेल्टा (बी १.६१७.२) व्हेरियंट झपाट्याने संसर्ग पसरवत आहे. हा धोका टाळण्यासाठी म्युटेशनचा अभ्यास करून लसीमध्ये बदल करावे लागतात. त्यासाठी जिनोम सिक्वेन्सचे तंत्र महत्त्वाचे असते. सुरुवातीला भारतात वुहानचा ‘अल्फा व्हेरियंट’ सापडला. त्यानंतरचा डेल्टा हा अल्फापेक्षा ५० टक्क्यांहून जास्त संक्रमण करणारा आहे. एम्समध्ये ६२ लोकांचा अभ्यास झाला. यातल्या ५० टक्के लोकांना दोन्ही डोस घेतल्यानंतरही पुन्हा संसर्ग झाला. लसीकरण कोरोनावरील एकमेव उपाय आहे. तो जास्तीत जास्त परिणामकारक ठरण्यासाठी जीनोम सर्व्हेलन्स महत्त्वाचे आहे.”
- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
चौकट
“जिनोम सिक्वेन्सिंग सातत्याने होणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला वेग आल्यास तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यासाठी, ती रोखण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो. जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये विषाणूतील जेनेटिक मटेरियलचा अभ्यास केला जातो. यात विषाणूची ताकद किती वाढली, विषाणू किती गंभीर स्वरूपाचा आहे, त्यापासून संसर्गाचा धोका किती पटीने जास्त आहे हे सर्व कयास बांधता येऊ शकतात.”
- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य