मेट्रो मार्गावरील भूगर्भाची तपासणी
By admin | Published: December 28, 2016 04:38 AM2016-12-28T04:38:16+5:302016-12-28T04:38:16+5:30
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावरील भूगर्भातील (जिओ टेक्निकल इन्व्हिेस्टिगेशन) माती व खडकांची तपासणी केली जाणार आहे. मेट्रोच्या ३१ किलोमीटरच्या मार्गावर
पुणे : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावरील भूगर्भातील (जिओ टेक्निकल इन्व्हिेस्टिगेशन) माती व खडकांची तपासणी केली जाणार आहे. मेट्रोच्या ३१ किलोमीटरच्या मार्गावर प्रत्येक १०० मीटर अंतरावर खोदाई करून माती व खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास करून त्यावरच मेट्रोच्या पुलाच्या पायाचा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पुणे मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी चिंचवड दरम्यान १६.५९ किलोमीटर तर वनाज ते रामवाडी यादरम्यान १४.६५ किलोमीटर असा सुमारे ३१ किलोमीटरचा मार्ग असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनीच प्राथमिक कामासही सुरुवात झाली असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली. ते म्हणाले, ३१ किलोमीटरच्या मार्गावर जमिनीखाली आणि जमिनीवर (टोपोग्राफीकल सर्वे) केला जाणार आहे. त्याची सुरूवात सोमवारपासून झाली आहे. संपुर्ण मार्गावर प्रत्येक १०० मीटर अंतरावर साधारणपणे २५ ते ३० मीटर खोल बोअर घेतले जातील. त्याद्वारे जमिनीखालील माती व खडकांचे नमुने संकलित करण्यात येणार आहेत. या नमुन्यांची स्वतंत्रपणे तपासणी केली जाईल. यातून मार्गावरील भुगर्भातील जमीन व खडकाची भार तोलून धरण्याची क्षमतेचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार पायाचा आराखडा निश्चित करण्यात येईल.
भुगर्भातील अभ्यासाबरोबरच मार्गावरील संपुर्ण जागेचे सर्वेक्षणही केले जाणार असून त्याला सुरूवात करण्यात आली आहे. हा अभ्यास साधारपणे दोन ते तीन महिने सुरू राहील. अभ्यास पुर्ण झाल्यानंतर मेट्रोचा अंतिम आराखडा तयार केला जाईल. त्याआधारारे निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे दिक्षीत यांनी स्पष्ट केले.