भारतीय विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने भारावले जर्मन विद्यार्थी, सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:11 PM2017-10-25T13:11:47+5:302017-10-25T13:17:26+5:30
भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणातून पुणे भेटीवर आलेले जर्मन विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या.
पुणे : गणेश वंदना, नांदी, तबला वादन, कथ्थक, भरतनाट्यम, कब डान्स, जर्मन डान्स, राजस्थानी नृत्य, बॉलिवूड डान्स आदी भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणातून पुणे भेटीवर आलेले जर्मन विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय आणि जर्मनीतील अॅड्रिआज श्नायडर शूल यांच्यातील शैक्षणिक व सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत जर्मनीतील सहा विद्यार्थी आणि दोन शिक्षक भारत भेटीला आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ देशपांडे या विद्यार्थिनीने छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट जर्मन भाषेत विशद केला. डीईएस-आयएएस जर्मन सेंटरच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जाणार्या डॉ. प्रांजली बोबडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
जर्मनीचे मुंबईतील उच्चायुक्त युरनेग मोरहार्ड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी, इंडो-जर्मन चेंबर आॅफ कॉमर्सचे फ्रॉक होपमन, जर्मन अॅकॅडमिक एक्स्चेंजच्या संचालिका देवी अराल्ड, उद्योजक मनोज बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमामुळे दोन देश जवळ येतात. त्यांचे शिक्षण, भाषा, संस्कृती, उद्योग आणि परस्पर परराष्ट्रीय संबंध दृढ होण्यासाठी मदत होते, असे मत युरगेन मोरहार्ड यांनी व्यक्त केले. दोन देशांतील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ सारखे नाहीत. त्यामध्ये चांगले किंवा वाईट असा भेद करू नका. ते तुमच्यापेक्षा कसे वेगळे आहेत याचा अभ्यास करा, असे विचार डॉ. कुंटे यांनी मांडले. ख्रिस्टियान म्युलर व अमेनी रिव्हेन्टलो या शिक्षकांनी विचार मांडले. प्राचार्य डॉ. परदेशी यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. या कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. सविता केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
पुढील पंधरा दिवस हे विद्यार्थी पुणे शहरात राहणार आहेत. पुण्याजवळील विविध ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रांना भेटी देणे, शहरातील प्रेक्षणीय स्थळांचा अभ्यास करणे, विविध कलांची माहिती घेणे, आदिवासी व कुटुंब पध्दती, ग्रामीण लोकजीवन अभ्यासणे, शाळा व महाविद्यालयातील शिक्षण पद्धतींचा तौलनिक अभ्यास करणे आदी बाबींचा या कार्यक्रमात सहभाग आहे. आदान-प्रदान उपक्रमाचा हा सहावा कार्यक्रम आहे. ही माहिती डॉ. केळकर यांनी दिली.