कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घाला ; पुण्याच्या डाॅ. कल्याण गंगवाल यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 06:27 PM2019-06-13T18:27:11+5:302019-06-13T18:28:48+5:30
कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घालावी अशी मागणी पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डाॅ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.
पुणे : आर्थिक दृष्टीकाेनातून प्राण्यांच्या शर्यती लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. नुकतास सणसर येथे कुत्र्यांच्या शर्यतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यामुळे कुत्र्यांच्या शर्यतींवर केंद्र आणि राज्या सरकारने तात्काळ बंदी घालावी अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डाॅ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे. डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, "मनोरंजन आणि स्पर्धांसाठी प्राण्यांचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. काही वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यती भरविल्या जात होत्या. त्यावर आवाज उठवत बंदी घालण्याची याचिका दाखल करून त्या थांबविल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातल्या इचलकरंजीत सायको रेसिंग क्लबने कुत्र्यांच्या स्पर्धा भरविल्या होत्या. तिथेही माझ्यासह ब्युटी विदाऊट क्रुएल्टीच्या अध्यक्षा डायना रत्नागर यांच्या मदतीने या शर्यती थांबविण्यात आल्या. आता पुणे जिल्ह्यातील सणसरमध्येही या कुत्र्यांच्या शर्यती भरविण्यात आल्या होत्या. या शर्यती बेकायदेशीर आणि कुत्र्यांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या आहेत."
"प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० (प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अनिमल्स ऍक्ट १९६०) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (महाराष्ट्र स्टेट प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट) या कायद्यानुसार या शर्यती बेकायदेशीर आहेत. कुत्र्यांच्या शर्यती भरविण्यावर या दोन्ही कायद्यांप्रमाणे कारवाई केली जावी. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी प्राण्यांनाही माणसांप्रमाणे जगण्याचे कायदेशीर हक्क असून, मानवाने त्याचे उल्लंघन करू नये, असा निर्वाळा दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने कुत्र्यांच्या शर्यतीवरील निर्बंध कडक करावेत व कुत्र्यांच्या शर्यतीचे हे लोन पसरणार नाही, याची काळजी घ्यावी," असे आवाहनही डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले आहे.