कोरोना लॉकडाऊनच्या कालखंडात घरबसल्या घ्या मानसिक आरोग्याची काळजी.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:09 PM2020-04-14T13:09:58+5:302020-04-14T13:16:32+5:30

ऑनलाईन, व्हाट्सअप, टेलिफोन द्वारे करणार समुपदेशन 

Get Mental Health Care During Corona Lockdown | कोरोना लॉकडाऊनच्या कालखंडात घरबसल्या घ्या मानसिक आरोग्याची काळजी.. 

कोरोना लॉकडाऊनच्या कालखंडात घरबसल्या घ्या मानसिक आरोग्याची काळजी.. 

Next
ठळक मुद्देबारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम  अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांबरोबर मानसिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे

रविकिरण सासवडे-  
बारामती : कोरोना या साथरोगामुळे मागील 20 दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साहजिकच या परिस्थितीमध्ये शाररिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याची देखील गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार शास्त्र विभागाच्या वतीने गरजू व्यक्तींना ऑनलाईन,  व्हाट्सअप आणि टेलिफोन द्वारे समुपदेशन करण्यात येणार आहे,  अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ.संताजी शेळके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. शेळके म्हणाले,  अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांबरोबर मनुष्य प्राण्यासाठी मानसिक आरोग्य ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. आपत्ती व आणीबाणीच्या काळात मानसिक आरोग्य खूपच महत्त्वाचे आहे. कोरोना आणीबाणीशी दोन हात करताना वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक मानसिक आरोग्याविषयी जागृत होणे व राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्यामध्ये आपले विचार, आपले बोलणे, आपली कृती आणि वर्तणूक यांचा समावेश होतो. कोरोनासारख्या आपत्ती बरोबर समायोजन करताना प्रत्येक व्यक्ती पुन्हा पुन्हा काही भावनिक व मानसिक अवस्थांमधून कमी-अधिक प्रमाणात जात असतो. बेचैनी, चिंता, भीती, ताण आणि राग या भावना यशस्वीरित्या पार केल्यास विकास व विवेक ही अवस्था आपण गाठू शकतो. आता काय होईल? आपलं व आपल्या कुटुंबाचं काय होईल?अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला निरुत्तर करतात. प्रथम ही गोष्ट समजून घ्या की वरील सर्व प्रकारच्या भावना व प्रश्न मनात येणे ही अतिशय नॉर्मल व नैसर्गिक अशी ओघानेच येणारी गोष्ट आहे. या भावना आणि हे प्रश्न  आपलं मानसिक आरोग्य शाबूत असल्याचं  लक्षण आहे. या सर्व भावना,  हे सर्व प्रश्न आणि हे सर्व विचार आपल्याला आणीबाणीशी समायोजन करायला मदतच करतात.  त्यामुळे कृपया घाबरून जाऊ नये, असेही डॉ. संताजी शेळके यांनी सांगितले. डॉ. शेळके यांच्या सोबत डॉ. स्नेहा बोबडे या देखील गरजू व्यक्तींना समुपदेशन करणार आहेत. 
..............
छंद जोपासा, मुलांना वेळ द्या, मन रमवा...
साबणाने हात धुणे, स्वत:चे कपडे धुणे, इस्त्री करणे, स्वयंपाकात मदत करणे ई. कामे केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. दरवाजाचे हॅन्डल, मोबाईल,  कम्प्युटर, लॅपटॉप व घरा बाहेरून आणलेल्या वस्तू शांतपणे, निवांतपणे व हळुवारपणे निजंर्तुक करू शकतो. यालाच माईंड फुलनेस मेडिटेशन असेही म्हणतात. नकारात्मक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, सोशल मीडिया, टीका, निंदा यावरचा वेळ आपण कमी करून तो वेळ विनोदी कार्यक्रम, चित्रपट, माहितीपट, वाचन, लेखन, प्रेम, दया, सहानुभूती आणि  सद्सद्विवेकबुद्धी या गोष्टींवर खर्च करू शकतो.  'मुलांना वेळ देऊ शकत नाहीत!' अशा पालकांसाठी तर ही सुवर्णसंधी आहे. 
-----------------------------------

Web Title: Get Mental Health Care During Corona Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.