मोबाईल ‘स्कॅन’ करा तिकिट मिळवा
By admin | Published: June 23, 2017 01:27 AM2017-06-23T01:27:14+5:302017-06-23T01:27:14+5:30
रेल्वे स्थानंकावर प्रवाशांची तिकिट रांगेतून मुक्तता व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रयोग राबवले जात आहे. त्याच धर्तीवर प्रवाशांना आता मोबाईल तिकिटाची सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वे स्थानंकावर प्रवाशांची तिकिट रांगेतून मुक्तता व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रयोग राबवले जात आहे. त्याच धर्तीवर प्रवाशांना आता मोबाईल तिकिटाची सुविधा लवकरच मिळणार आहे. मोबाईल स्कॅन करुन त्वरित तिकिट देणारे नवे एटीव्हीएम मशीन रेल्वे बसवण्याच्या तयारीत आहे.
रेल्वे सुचना प्रणाली केंद्राकडून (क्रिस) या बाबतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रत्येकी ५ रेल्वे स्थानकांत सर्वप्रथम ही सुविधा देण्यात येणार आहे. पेपरलेस तिकिटांपेक्षा प्रवाशांचा प्रतिसाद पेपर तिकिटाला जास्त आहे. त्यामुळे स्कॅन तिकिटासाठी नवे आधुनिक एटीव्हीएम बसवण्यात येणार आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमाने तिकिट बूक केल्यानंतर प्रवाशांना आयआर कोड मिळेल.
या आयआर कोडद्वारे मोबाईल स्कॅन करुन त्वरित तिकिट मिळणे शक्य आहे. महिनाभरात नवे एटीव्हीएम स्थानकांवर बसवण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचवा या दृष्टिकोनातून सद्य प्रकियेत बदल करण्याचा प्रयत्न क्रिसच्या वतीने करण्यात येत आहे. बहुतांशी प्रवाशांकडे स्मार्ट फोन आहे. त्याचा स्कॅनर म्हणून वापर करुन त्वरित तिकिट मिळवता येणे शक्य आहे.
महिन्याभरात मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर ही सेवा देण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांवर स्कॅन करुन तिकिट मिळवता येणार असल्याची माहिती क्रिसचे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली.