मोटार परवाना काढा अन्यथा घरी बसा; तुकाराम मुंढे यांचा पीएमपी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:55 PM2018-01-24T17:55:05+5:302018-01-24T17:58:21+5:30
पीएमपीतील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे.
पुणे : मोटार वाहतुक कामगार कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)तील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे.
पीएमटी व पीसीएमटीच्या एकत्रीकरणातून २००७ पीएमपी या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. मात्र, मागील दहा वर्षांत कंपनीची वाटचाल कंपनीची रचना, विविध वाहतुकविषयक कायदे याप्रमाणे क्वचितच पाहायला मिळाली. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नियमांवर बोट ठेवत कामाला सुरूवात केली. प्रत्येक कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी कामाची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यातून भोंगळ कारभाराची प्रचिती आली. मोटार वाहतुक कामगार कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कायद्यानुसार ‘पीएमपी’मधील आगार व्यवस्थापक, आगार अभियंते तसेच तांत्रिक विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. मात्र, ‘पीएमपी’मध्ये बहुतेकांकडे हा परवाना नाही. त्याअनुषंगाने परवाना नसलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
आगार व्यवस्थापक, आगार अभियंते, सहायक अभियंते, मेकॅनिक, टाईम कीपर, इतर तांत्रिक कर्मचाºयांचा त्यामध्ये समावेश आहे. बसच्या देखभाल-दुरूस्तीमध्ये या सर्वांचा थेट संबंध येत असतो. त्याची केवळ तांत्रिक माहिती असून उपयोग होत नाही. ही बस चालविता येणेही अपेक्षित आहे. त्याशिवाय त्यातील तांत्रिक बाबी पुर्णपणे कळणार नाही. तसेच मार्गावर बस चालविताना चालकांना येणारे अडथळे, त्यासाठी घ्यावयाची काळजी, तांत्रिक बिघाड, ब्रेक, क्लचचा वापर या सर्व बाबींची माहिती संबंधितांना हवी. त्यासाठी जड वाहन चालविण्याचा परवाना मिळविणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे.
कायद्यानुसार आगार प्रमुखांसह कार्यशाळेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे परवाना असणे आवश्यक आहे. बसची कामे करताना बस चालविण्याची माहिती असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय बसमधील तांत्रिक बिघाड संबंधित अधिकाऱ्यांना समजणारच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा परवाना नाही, त्या सर्वांना काही दिवसांपुर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ