सामाजिक प्रबोधनानेच बसेल आळा

By admin | Published: February 22, 2015 12:27 AM2015-02-22T00:27:43+5:302015-02-22T00:27:43+5:30

‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पुण्यातील असुरक्षिततेचे भयाण चित्र समोर आणले आहे. आज सकाळपासून अनेकांचे फोन आले.

Get out of social awakening | सामाजिक प्रबोधनानेच बसेल आळा

सामाजिक प्रबोधनानेच बसेल आळा

Next

‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पुण्यातील असुरक्षिततेचे भयाण चित्र समोर आणले आहे. आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. यात काहींना प्रत्यक्षात हल्ला झाल्याचे वाटले तर अनेकांचे काही झाले नाही ना, अशी विचारपूस करणारे फोन आले. या सर्व घडामोडींमध्ये सर्वसामान्य लोक दूर राहिल्याचे दिसून आले. यावरून अशा घटना घडल्यानंतर त्या वेळी नागरिकांनी काय केले पाहिजे, याचे प्रशिक्षण त्यांना देण्याची गरज आहे. यातूनच समाजप्रबोधन होईल आणि अशा घटनांना आळा घालता येईल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मित्र, कुटुंबीय, हितचिंतक तसेच विद्यार्थ्यांनी दूरध्वनी करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. काही विद्यार्थ्यांनी, सर, आम्ही तुमच्यासोबत फिरायला येत जाऊ, असे सांगितले. तुमचा दररोजचा फिरण्याचा मार्ग बदला, दररोज नाही गेलात तरी चालेल, असे सल्ले देणारे अनेक दूरध्वनी आले. पोलिसांचा वचक निर्माण व्हावा तसेच हल्लेखोर पोलिसांच्या भीतीने हल्ला करण्यास धजावणार नाहीत, असा वचक पोलिसांनी निर्माण करायला हवा.
- हरी नरके

नातेवाईक, मित्रमंडळींनी फोन करून, तुम्ही सुरक्षित आहात ना, अशी विचारणा केली. स्टिंग आॅपरेशन आहे हे अनेकांना कळले नव्हते. त्यामुळे खरंच काहीही झालेले नाही ना, असे आवर्जून विचारले जात होते. एक महिला या घटनेची साक्षीदार ठरू शकली असती; मात्र तिने याकडे दुर्लक्ष केले. यातून समाजाच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडले. याबाबत समाजात जागृती होणे गरजेचे आहे.
-विद्या बाळ

पुण्यासह बुलढाणा, परभणी, औरंगाबाद येथूनही विचारणा करणारे फोन आले. तसेच विघातक लोकांना भीक न घालता आपण पोलिसांना कळवायला हवे, असा विधायक मार्गही सुचवला. धमक्यांच्या फोन कॉल्सला रेकॉर्डही करून ठेवायला हवेत, असेही सांगण्यात आले. पोलीस हे समाजविरोधी आहेत असे चित्र निर्माण न करता पोलिसांबरोबर काम करायला हवे.
-असीम सरोदे

पुण्यात ३१ जणांना सुरक्षा
४ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ३१ जणांना पोलिसांनी सुरक्षा पुरवलेली आहे.
४शहर पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले, संजय काकडे, आढळराव पाटील यांच्यासह चार खासदारांना आणि अकरा आमदारांना सुरक्षा पुरवलेली आहे. आमदार आणि खासदारांना शासनातर्फेच सुरक्षा देण्याचा ‘प्रोटोकॉल’ आहे. साखर आयुक्त विपीन शर्मा यांनाही शासन आदेशान्वये सुरक्षा देण्यात आलेली आहे. खासगी व्यक्तींपैकी मिलिंद एकबोटे यांना शासनाच्या आदेशाने सुरक्षा देण्यात आलेली आहे.
४महत्त्वाच्या गुन्ह्यातील फिर्यादीला सुरक्षा पुरवण्यात आली असून, ८ खासगी व्यक्तीही पोलिसांच्या सुरक्षेचा सशुल्क लाभ घेत आहेत. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेकडून धमकी आलेला एका बांधकाम व्यावसायिक व दुसऱ्या एका व्यावसायिकालाही सुरक्षा दिलेली आहे. ज्यांनी सुरक्षा घेतली आहे त्यांच्या सुरक्षेचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जातो.

सोशल
मीडियावर संतापाची लाट
पुरोगामी विचारसरणीचे नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबत झोपलेले पोलीस आणि असंवेदनशील समाजाचे चित्र ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले. त्यामुळे सकाळपासून सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त होत होत्या.
या स्टिंग आॅपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना, पुरोगामी नेत्यांना सकाळपासूनच फोन येत होते. ‘समाजविघातक शक्तींशी लढण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत’, अशा प्रतिक्रिया फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवरही येत होत्या. यामध्ये दोन मोठ्या सामाजिक परिवर्तनवादी नेत्यांवर हल्ले झाल्यानंतरही पोलीस आणि राज्य सरकार झोपले असल्याविरोधात जळजळीत प्रतिक्रिया दिल्या.

 

Web Title: Get out of social awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.