Raj Thackeray: विधानसभेच्या तयारीला लागा! राज ठाकरेंचा आदेश, मनसे पुण्यातील सर्व जागा लढणार
By राजू इनामदार | Published: July 31, 2024 03:40 PM2024-07-31T15:40:48+5:302024-07-31T15:41:36+5:30
पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व, म्हणजे २१ जागा आपण लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितले
पुणे: शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व, म्हणजे २१ जागा आपण लढवणार आहोत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितले. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर अनौपचारिक चर्चा केली, त्यावेळी त्यांनी शहरातील ८ व जिल्ह्यातील अन्य विधानसभा (Vidhan Sabha) मतदारसंघांची माहिती या पदाधिकाऱ्यांकडून घेतली.
विधानसभा स्वबळावर अशी घोषणा राज यांनी मुंबईत गुढीपाडव्याला केल्यानंतरच मनसेकडून प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा निवडणुक लढवण्याची कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली आहे. लोकसभेला राज यांनी महायुतीला (Mahayuti) पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्यासाठी बऱ्याच लोकसभा मतदारसंघात जाहीर सभाही घेतल्या. मात्र तसे करताना त्यांनी लोकसभेसाठी एकही जागा त्यांच्याकडे मागितली नव्हती, किंवा लढवलीही नाही. त्याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आता विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेश दिला होता. पुण्यातील दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली.
पुणे शहर लोकसभतंर्गत असलेले कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेट हे ६ व हडपसर, खडकवासला हे दोन असे ८ विधानसभा मतदारसंघ लढण्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर अनौपचारिक चर्चा केली. ही बैठक नव्हती, मात्र राज यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकूण राजकीय स्थिती जाणून घेतली असे या चर्चेला उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न कऱण्याच्या अटीवर सांगितले. पुण्यात पक्षाला सुरूवातीच्या काळात अनुकूल वातावरण होते, त्यात फरक पडत गेला व आता फारशी चांगली स्थिती नाही, असे का? याची कारणे राज यांनी पदाधिकाऱ्यांना विचारली. काहीही असले तरी सर्व मतदारसंघ आपण लढवणार आहोत, त्यादृष्टिने कामाला सुरूवात करा असे त्यांनी सांगितले. नवीन शाखा, कार्यकर्त्यांच्या बैठका, सक्रिय नसलेल्यांना बाजूला करणे, सक्रिय असलेल्यांना जबाबदारी सोपवणे अशा सुचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केल्या.
राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या राजकीय सर्वेक्षणासाठी राज यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या पदाधिकाऱ्यांनी संबधित जिल्ह्यात जाऊन एकूण राजकीय पाहणी करून प्लस-मायनस असा अहवाल राज यांना द्यायचा होता. पुणे ग्रामीणसाठी त्यांनी पालघर-डहाणू येथील अविनाश जाधव यांची नियुक्ती केली होती. जाधव यांनी आपला अहवाल राज यांना दिला असल्याची माहिती मिळाली. त्यात हडपसर, खडकवासला, जून्नर, पुरंदर, भोर-वेल्हे, खेड-आळंदी, भोसरी, अशा काही विधानसभा मतदारसंघांबाबत अनुकूल तर दौंड, इंदापूर, बारामती व अन्य काही मतदारसंघात प्रतिकूल अभिप्राय दिले असल्याचे समजते.
राज यांना पुणे शहर व जिल्ह्याचीही बारकाईने माहिती आहे. पुण्याबद्दल त्यांना आत्यंतिक जिव्हाळा आहे. त्यांचा आदेश आमच्यासाठी सर्व काही आहे. त्यामुळे आम्ही जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघ लढण्याच्या तयारीत आहोत. - बाबू वागसकर- संपर्क नेते, महाराष्ट्र
पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांकडेही राज्यातील जिल्ह्यांच्या सर्वेक्षणाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने बाबू वागसकर- सोलापूर, परभणी- ॲड. गणेश सातपुते, हिंगोली- हेमंत संभूस, बुलढाणा- साईनाथ बाबर यांचा समावेश होता. या पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या जिल्ह्यांचे अहवाल राज यांना दिले असल्याची माहिती मिळाली.