दहावीच्या नव्या ‘परीक्षे’साठी सज्ज व्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:58+5:302021-07-22T04:07:58+5:30
कोरोनामुळे अजूनही राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीनेच शिक्षण घ्यावे लागत आहे. मात्र, मागील वर्षी ...
कोरोनामुळे अजूनही राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीनेच शिक्षण घ्यावे लागत आहे. मात्र, मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता. या वर्षीसुध्दा अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे किंवा नाही? याबाबत अद्याप शिक्षण विभागाने स्पष्टता दिलेली नाही. तसेच शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी व शिक्षकांची कोरोनाबाबत कशी काळजी घेण्यासाठी शाळांकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने याबाबत आत्ताच नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच मागील वर्षी नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच वर्गोन्नती देण्यात आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे कोणतेच गुण शाळांकडे उपलब्ध नाहीत. परिणामी या वर्षीही शाळा सुरू झाल्या नाहीत तर दहावीचा निकाल तयार करण्यास अडचणी येऊ शकतात.
या वर्षी दहावीच्या परीक्षा मार्च २०२१ मध्ये घेतल्या जाणार होत्या. परंतु, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार मे-जून महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यापुढील परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन स्तरावरून जाहीर करण्यात आला. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी नववीचे ५० गुण, दहावीचे अंतर्गत परीक्षांचे ३० गुण आणि अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण देण्याचे निश्चित करण्यात आले.
शासन आदेशानुसार राज्य मंडळाच्या परीक्षा समितीने सविस्तर परिपत्रक तयार केले. त्यासाठी आवश्यक संगणकीय प्रणाली तयार केली. त्याचप्रमाणे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील व इतर सदस्यांनी व्हिडिओ द्वारे सर्व शिक्षकांना मूल्यांकन प्रक्रियेचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची विषय निहाय गुणपत्रिका तयार करणे, त्यांचा संकलित निकाल तयार करणे तसेच संबंधित निकाल संगणकीय प्रणालीत भरणे ही माहिती शिक्षकांनी समजून घेतल्यानंतर निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला.
विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षेसाठी १७ नंबरचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे गुण संकलित करण्याचे मोठे आव्हान होते. वर्षभर ऑनलाईन वर्गांना अनुपस्थित असलेला विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घरी जावे लागले. तसेच काही विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे स्थलांतर केले. त्यामुळे सर्व प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांची ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवावे लागले.
राज्य मंडळाच्या निकाल प्रक्रियेत राज्य समन्वयक म्हणून मला काम करता आले. दहावीच्या निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेत आलेल्या अनुभवांचा विचार करता. पुढील वर्षी याच पद्धतीने दहावीचा निकाल तयार करता येणार नाही. त्यामुळे केवळ शिक्षण विभागच नाही तर विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक या सर्व घटकांना यापुढे नियोजन पध्दतीने आणि जबाबदारीने वागावे लागणार आहे.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ