व्यंगचित्रकलेला अभ्यासक्रमाची जोड मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:51 AM2018-04-03T02:51:44+5:302018-04-03T02:51:44+5:30

गेल्या काही काळात वर्तमानपत्रातील व्यंगचित्रांचे प्रमाण कमी झाले होते. व्यंगचित्रकलेबाबत उदासीनता पाहायला मिळत होती. मात्र, व्यंगचित्रांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत, याचे समाधान वाटते. भाषा, प्रांत आणि देशाच्या सीमा ओलांडणाऱ्या शब्दविरहित व्यंगचित्रांची योग्य दखल घेतली जात आहे.

 Get rid of a cartoon curriculum | व्यंगचित्रकलेला अभ्यासक्रमाची जोड मिळावी

व्यंगचित्रकलेला अभ्यासक्रमाची जोड मिळावी

googlenewsNext

गेल्या काही काळात वर्तमानपत्रातील व्यंगचित्रांचे प्रमाण कमी झाले होते. व्यंगचित्रकलेबाबत उदासीनता पाहायला मिळत होती. मात्र, व्यंगचित्रांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत, याचे समाधान वाटते. भाषा, प्रांत आणि देशाच्या सीमा ओलांडणाऱ्या शब्दविरहित व्यंगचित्रांची योग्य दखल घेतली जात आहे. व्यंगचित्रकारांच्या कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेतर्फे आयोजित संमेलनात प्रारंभी १०-१५ व्यंगचित्रकारांचा समावेश असायचा. हीच संख्या आता १००-१५० वर गेली आहे. हा चढता आलेख समाधानकारक आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिकाधिक तरुण या क्षेत्रात पाय रोवू पाहत आहेत. व्यंगचित्रकलेचे सकारात्मक चित्र तयार होण्यासाठी ही कला सर्वोच्च स्थानी जावी, यासाठी काही वेळ नक्की द्यावा लागेल. ही कला स्वत:ची गुणवत्ता कालानुरूप सिद्ध करेल यात तिळमात्रही शंका नाही.
पूर्वी व्यंगचित्रे केवळ वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत होती. आता माध्यमांचे प्रमाण आणि व्याप्ती विस्तारली आहे. विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. त्यामुळे काही क्षणांंमध्ये व्यंगचित्रे कलाप्रेमींपर्यंत पोहोचतात आणि त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.
मला लहानपणापासून चित्रे काढण्याचा छंद होता. मात्र चित्रकार व्हायचे असे ठरवले नव्हते. मी आणि वसंत सरवटेंनी एकत्र चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. ग्रेड परीक्षेत तीन पारितोषिके मिळाल्यानंतर तुला चित्रकला कळते, असे शिक्षकांनी सांगितले. ‘रेघोट्या मारून काय मिळणार’ असे लोक विचारायचे. चुकलेले चित्र म्हणजे व्यंगचित्र अशी क्रूर कल्पना त्या काळात रूढ होती. मात्र, व्यंगचित्रकलेवरील प्रेम कायम राहिले. एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत कलाक्षेत्राशी जुळलेली नाळ अद्याप कायम आहे. सर्व प्रांतांतील लोकांनी कायम प्रेम दिले. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघातर्फे २००० साली सु. ल. गद्रे हा पहिला पुरस्कार मिळाला. कोलकाता, बंगळुरू तसेच कोलकता येथील बुक फार्म संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्याचीच साक्ष देतात.
व्यंगचित्रांमधून भाषेच्या, प्रदेशाच्या सीमा ओलांडता येतात. व्यंगचित्रकला ही हास्यचित्रांतून उत्क्रांत झाली आहे. मात्र, या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्याप विकसित झालेला नाही. जीवनाकडे विनोदबुद्धीने पाहण्याचा दृष्टिकोन व्यंगचित्रांमधून मिळतो. हास्यचित्रांचा जन्मच त्रुटीतून, विसंगतीतून होतो. ही कला छंद म्हणून जोपासण्याकडे अनेक तरुणांचा कल असतो. मात्र, व्यंगचित्रकला पूर्णवेळ आत्मसात करायची असेल तर उपजत गुणांना योग्य शिक्षणाची जोड मिळायला हवी. तरुणांमधील कलेला योग्य दिशा मिळावी, याचे शिक्षण देणारी अनेक कलामहाविद्यालये बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आहेत.
मात्र, व्यंगचित्रकलेचे शिक्षण देणारे महाविद्यालय कोठेही उपलब्ध नाही. बरेचदा याबाबत चर्चा, मागणी तसेच प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावांना ठोस स्वरूप येऊन भविष्यात महाविद्यालयांमध्ये व्यंगचित्रकलेचे शिक्षण मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. व्यंगचित्रकला हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. कलेतून मुलांचा सर्वांगीण विकास घडतो. त्यांना पुस्तकाबाहेरचे जग समजण्यास मदत होते. त्यामुळे अभ्यासक्रमांमध्ये कलेचा समावेश महत्त्वपूर्ण ठरतो.
 

Web Title:  Get rid of a cartoon curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.