Pune Rain: उकाड्यापासून सुटका! पुण्यात उद्यापासून पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: September 5, 2023 07:57 PM2023-09-05T19:57:15+5:302023-09-05T19:57:26+5:30
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता
पुणे : सध्या दुपारी प्रचंड उकाडा जाणवत असून, उद्यापासून (दि. ६) सायंकाळनंतर पुणे परिसरात व राज्यातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. आता पुण्याला पाणीपुरवठा करणारे धरणही अर्धेच आहे. ते पूर्णपणे भरलेले नाही. त्यामुळे सर्वजण चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे ७ व ८ सप्टेंबर रोजी पुणे व राज्यात पावसाचा अंदाज आहे. ऑरेंज अलर्टदेखील येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
''सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असल्याने उद्यापासून पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. या पावसाचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. घाट माथ्यावर मुसळधारची शक्यता आहे. - अनुपम कश्यमी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग''