वाहन कागदपत्राच्या जाचातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:55 AM2018-05-25T01:55:06+5:302018-05-25T01:55:06+5:30
डिजीलॉकरचा आधार; कागदपत्रे बाळगण्याची गरज संपणार
पुणे : वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र खराब झाले, गहाळ झाले, वाहन चालविताना कागदपत्रे जवळ नसली तरी आता चिंता करण्याची गरज नाही. या कागदपत्रांबरोबरच इतर शासकीय आणि वैयक्तिक प्रमाणपत्र संगणकीय ‘डिजिटल लॉकर’मध्ये (डिजीलॉकर) जमा करता येणार आहेत. ‘एम परिवहन’ या मोबाइल अॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मोबाइल अॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात येईल. कागदपत्रांची सुरक्षितता देखील यामुळे वाढणार आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी आणि राष्ट्रीय माहिती केंद्राचे तांत्रिक संचालक दीपक सोनार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान विभागाने डिजिटल लॉकर ही संकल्पना आणली असून, विविध शासकीय संस्थांकडून नागरिकांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे त्यावर जतन करून ठेवण्यात येत आहेत. त्यासाठी नागरिकांना डिजिटल लॉकरचे खाते उघडावे लागेल.
डिजिटल लॉकरचे खाते कसे सुरु कराल?
डिजिटल लॉकरचे खाते सुरू करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असून, तो मोबाइल क्रमांकाशी जोडलेला असणे गरजेचे आहे. ‘डिजीलॉकर’ या संकेतस्थळावर जाऊन अथवा प्लेस्टोअरमधून डिजीलॉकर हे अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर आधार क्रमांक नोंदवून या अॅपवर लॉग इन व्हावे. या प्रकियेनंतर संबंधितांच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. तो भरल्यास संबंधित खाते कार्यान्वित होते.