‘सरल’ला मिळेना ‘आधार’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:44 AM2017-10-02T03:44:47+5:302017-10-02T03:44:51+5:30

‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे आधार नसणे तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी ‘सरल’मध्ये नोंदविण्यात आलेल्या

Get 'simple' with 'base' | ‘सरल’ला मिळेना ‘आधार’ची साथ

‘सरल’ला मिळेना ‘आधार’ची साथ

Next

पुणे : ‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे आधार नसणे तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी ‘सरल’मध्ये नोंदविण्यात आलेल्या नावांत बदल अशा विविध तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. माहिती भरण्यासाठी आता केवळ चार दिवस उरल्याने काही शिक्षक संघटनांनी या वर्षी ‘सरल’साठी आधार बंधनकारक करू नये, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’ प्रणालीमध्ये भरण्याची लगबग सध्या सर्वच शाळांमध्ये आहे. दररोज दोन-तीन शिक्षकांना हेच काम करावे लागत आहे. माहिती न भरल्यास संच मान्यतेसाठी शाळांना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे शिक्षकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. मात्र, ही माहिती भरताना सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यातच या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या अडचणींमध्ये भर पडली आहे. यापूर्वीच शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या वेळी अद्ययावत केली जात आहे. ही
माहिती अद्ययावत करताना आधार कार्डवरील माहिती व आधीच माहिती याची खातरजमा करूनच भरावी
लागत आहे.
मात्र, काही विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख, वडलांचे नाव आणि यापूर्वी सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीमध्ये काहीसा बदल आढळून येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’मध्ये भरली जात नाही. तर काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने त्यांची माहिती भरणे अशक्य आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्डसाठी नोंदणी केल्याची पावती आहे. मात्र, त्याआधारे ‘सरल’मध्ये माहिती भरण्यातही शिक्षकांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने आधार सक्ती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
आधारकार्ड काढण्यास व बोगस विद्यार्थी शोधण्यास आमचा विरोध नाही. मात्र, याबाबत शासन व पालक यांचे योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने शाळांमध्ये अराजकता निर्माण झाली आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. तसेच, राज्यातील विनानुदानिक शिक्षक संघटनेनेही आधार सक्तीला विरोधाचा पवित्रा घेतला असल्याचे पुणे जिल्हा विनानुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गवारी यांनी सांगितले.

‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसभर तांत्रिक अडचणींमुळे माहिती अद्ययावत करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे बोटांवर मोजण्याइतपत विद्यार्थ्यांची माहिती भरली जात आहे. त्यामुळे काही शाळांतील शिक्षकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. एका शाळेतील शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम मध्यरात्री दोन-तीन वाजेपर्यंत करावे लागत आहे. शाळेतील शिक्षिकाही दहा वाजेपर्यंत थांबतात. तर काही शिक्षक घरातील संगणकावर हे काम करत आहेत. माहिती भरली जात नसल्याने संच मान्यतेत शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरू नये, या भीतीने शिक्षकांची धावपळ सुरू आहे.

Web Title: Get 'simple' with 'base'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.