ग्रामीण भागातील हाॅटेलस् , रेस्टॉरंट व बार त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:16+5:302021-06-22T04:08:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट व बार रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट व बार रात्री दहा पर्यंत सुरू केले आहेत. परंतु ग्रामीण भागात गेल्या वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने हाॅटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, येथील हाॅटेलस्, रेस्टॉरंट व बार त्वरित सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा (ग्रामीण) हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
प्रशासनाने दहा जूनपासून पुणे शहरातील रेस्टॉरंट व बार चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ग्रामीण भागालाही ‘होम डिलिव्हरी’ची परवानगी दिली आहे. पण ग्रामीण भागातील ग्राहक शहरातील ग्राहकांप्रमाणे सुशिक्षित आणि ‘टेक्नोसॅवी’ नसल्याने ‘होम डिलिव्हरी’ सुविधेचा फार उपयोग करत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल चालत नाहीत. ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी द्यावी. जिल्ह्यातील ग्रामीण भागात संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रेस्टॉरंट व बारमधून मद्य व जेवणाची पार्सल सुविधा त्वरित चालू करण्याची परवानगी द्यावी. आम्ही एका वेळी एकाच ग्राहकास पार्सल देवू, असे संघटनेने म्हटले आहे.
चौकट
‘एमआयडीसी’तील हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू करा
पुणे जिल्ह्यातील सर्व एसईझेड, एमआयडीसी आणि औद्योगीक विभागातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत. त्यामुळे औद्योगीक विभागातील कामगार व अधिकारी व तेथे येणाऱ्या मालवाहतूक कर्मचाऱ्यांची उदरनिर्वाहाची सोय होईल. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन आमच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे.
- बाळासाहेब दाते, अध्यक्ष, जिल्हा (ग्रामीण) हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन