नव्या युगाचे साहित्य लिहिण्यास करा सुरुवात - गेल आॅम्व्हेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:38 AM2019-03-18T03:38:27+5:302019-03-18T03:38:32+5:30
साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे.
पुणे : साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे. नव्या युगाचे साहित्य लिहिण्यास आपण सुरुवात करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखिका गेल आॅम्व्हेट यांनी व्यक्त केली.
दलित युवक आंदोलन प्रणीत सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन २०१९ चे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका गेल आॅम्व्हेट आणि पत्रकार प्रतिमा जोशी मुंबई यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या.
संमेलनात स्वागताध्यक्ष मुक्ताई प्रतिष्ठान अध्यक्ष शशिकांत घोडे, दलित युवक आंदोलन संस्थापक अध्यक्ष, सचिन बगाडे, अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे सोपान खुडे, सरू वाघमारे, भारत पाटणकर, प्रज्ञा कांबळे, प्रकाश सोनवणे, जोशीला लोमटे आदी उपस्थित होते. गुलामगिरीच्या बेड्या तोडून दुसऱ्या मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
आॅम्व्हेट म्हणाल्या, आजचे साहित्य दोन प्रकारचे आहे. एक प्रकार सरळ प्रस्थापित साहित्याचा आहे. दुसरा प्रकार जग बदलण्याची स्वप्ने पाहणारा, जनांच्या जीवनातील नवनिर्मितीचा, आणि सुंदरतेच्या बाबतीत साहित्य निर्माण करणारा आहे. साहित्य लिखाणात आनंदाचे प्रसंग, दु:ख संपवण्याची जिद्द, नवे जीवन मिळवण्याचा संघर्ष असायला पाहिजे.
माणूस म्हणून जगणं विसरलोय...
१ प्रतिमा जोशी म्हणाल्या, साहित्याचा दर्द आपण दु:ख या अर्थाने घेतो. साहित्यिक आपल्या भावनेतून कला व्यक्त करत असतो. सर्वश्रेष्ठ विनोदाला कारुण्याची उमेद असते. हे सर्व कलेचे पैलू आहेत. शिक्षणाने माणसे शहाणी होतात; परंतु आजच्या परिस्थितीत आपण माणूस म्हणून जगणे विसरलो आहे.
२ काव्याला साहित्य, संस्कृतीत फारच महत्त्व असते. काव्य हे माणसाच्या हृदयातून यावे लागते. त्यासाठी आजूबाजूच्या माणूस आणि सृष्टीविषयी प्रेम असणे गरजेचे आहे. साहित्य हे रोजच्या जगण्यापेक्षा वेगळे नसते. तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवते.
घोडे म्हणाले, महिलांना महात्मा फुले यांनी शिक्षण देऊन इतिहास घडवला. ज्या देशात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, तो देश इतिहासात प्रगतशील आहे. समाजात मुलींना शिक्षण, महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यास प्रवृत्त केले तर भारत देशाला महासत्ता होण्यास कोणीही रोखू शकणार नाही.
खुडे म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला. पण या शिक्षणाचा सद्यस्थितीत फायदा होत आहे का, सर्वांनी याचा विचार करायला हवा. आईवडिलांचा आदर करा. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करा. साहित्य संमेलनातून हे विचार मांडणार आहोत.