‘युनिव्हर्सल पास’ घरबसल्या मिळवा, मॉल-एसटी-रेल्वेने खुश्शाल फिरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:36+5:302021-08-22T04:13:36+5:30
डमी १०७८ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का? हा प्रश्न आता सर्वच स्तरावर विचारला ...
डमी १०७८
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का? हा प्रश्न आता सर्वच स्तरावर विचारला जात आहे. यात रेल्वे, हवाई प्रवास असो वा साध्या मॉलमध्ये प्रवेश असो. या सर्व प्रश्नांवरचे उत्तर म्हणजे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास’. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना हा पास आता घरबसल्या काढता येणार आहे. पुणे महापालिकेनेही पुणे रेल्वे स्टेशन व शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे हा पास काढून देण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़
पुण्यातून रोज शेकडो जणांना कामानिमित्त नियमितपणे पुणे-मुंबई व अन्यत्र रेल्वे प्रवास करावा लागतो. एसटी प्रवाशांची संख्या मोठी आहे. राज्याबाहेर जाण्यासाठीही एसटी, रेल्वे, विमानाचा उपयोग होतो. शिवाय शहरातल्या मॉल्समध्ये जाण्यासाठीही लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्यासाठीच सरकारने ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास’ आवश्यक केला आहे. हा पास प्रत्येकाला ऑनलाईन काढता येतो. याकरिता पात्र नागरिकांना ‘ ँ३३स्र२://ीस्रं२२े२ेिं.ेंँं्र३.ङ्म१ॅ ’ ही वेब लिंक उघडून त्यावरून हा पास घरबसल्या मिळवता येणार आहे. महापालिका प्रशासनानेही १५ ऑगस्टपासून शिवाजीनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रत्येकी आठ शिक्षकांची नियुक्ती हे पास काढून देण्यासाठी केली आहे़
चौकट :
* शहरात दोन्ही डोस घेतले एकूण नागरिक : ७ लाख ४६ हजार ६१०
फ्रंटलाईन वर्कर्स - ६० हजार ८९
आरोग्य कर्मचारी - ५६ हजार ९८५
१८ ते ४४ वयोगट - ९४ हजार ६४५
४५ ते ५९ - ३ लाख २ हजार २४२
६० पेक्षा जास्त वयाचे - २ लाख ५० हजार ६४९
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण -२३.३३ टक्के
चौकट
असा मिळवा ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास’
-पात्र नागरिकांनी ँ३३स्र२://ीस्रं२२े२ेिं.ेंँं्र३.ङ्म१ॅ ही वेब लिंक उघडावी.
-त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
-त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाईल क्रमांक नमूद करा. लगेचच मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
-हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील समोर येईल.
-त्यात ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पयार्यावर क्लिक करावे.
-त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
-या तपशीलात ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वत:चे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.
चौकट
“ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण झालेले आहे व दुसरी लस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले आहेत, अशा नागरिकांना शासनाच्या सूचनेनुसार १५ ऑगस्टपासून रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यानुसार ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास’ देण्यापूर्वी ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांबाबत खातरजमा करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड व छायाचित्र ओळखपत्र यांची पडताळणी करण्यात येणार आहे.”
-महापालिका प्रशासन