'कमी किमतीत सोने मिळवून देतो...' गोल्ड ट्रेडचे आमिष दाखवून साडेतीन लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: August 24, 2023 04:00 PM2023-08-24T16:00:37+5:302023-08-24T16:01:05+5:30
कमी किमतीत सोने मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार
पुणे : बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शरद रामचंद्र नायर (वय २८, रा. बाणेर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविशंकर मेटलापल्ली याने नायर यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करून गोल्ड ट्रेडबाबत माहिती दिली. बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने मिळवून देतो असे सांगितले. फिर्यादींचा विश्वास पटल्याने त्यांनी सोने खरेदी करण्यासाठी होकार दिला. तुम्हाला २४ कॅरेट सोन्याचे १०० ग्रॅमचे सॅम्पल पाठवतो, त्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये पाठवावे लागतील असे सांगितले. त्याप्रमाणे नायर यांनी साडेतीन लाख रुपये पाठवले. मात्र सॅम्पल मिळाले नाही म्हणून विचारणा केली असता आरोपीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. बालाजी पांढरे पुढील तपास करत आहेत.