Booster Dose: बूस्टर मिळतोय फुकट, तरी लसीकरणाकडे पाठ; पुण्यात ५ दिवसांत १९ हजार जणांनी घेतला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:02 AM2022-07-21T11:02:52+5:302022-07-21T11:02:59+5:30
लसीचा बूस्टर लस घेण्यासाठी ३५० रुपये मोजावे लागतात म्हणून अनेकांनी केली होती टाळाटाळ
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस मोफत देण्यास १५ जुलैपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या मोहिमेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. शहरात पाच दिवसांमध्ये १८ ते ५९ वयोगटातील १९ हजार १७१ जणांनी बूस्टर डोस घेतल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र शासनाने ६० वर्षांवरील तसेच फ्रंट लाइन वर्कर यांना मोफत बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. त्यानुसार अनेकांनी याचा लाभ घेतला. दरम्यानच्या काळामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांना १५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ जुलैला पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुमारे ११ हजार जणांनी बूस्टर डोस घेतला होता. तर शहरात याचे प्रमाण अत्यल्प होते.
३० सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत लस
कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर लस घेण्यासाठी ३५० रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे अनेकांनी ही लस घेण्यास टाळाटाळ केली होती. शिवाय कोरोना संसर्गाचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र, ज्यावेळी बाधितांची संख्या वाढू लागली त्यावेळी शहरात ६० वर्षांवरील लोकांसाठी लस मोफत करण्यात आली असता एक लाख ६७ हजार ८२५ ज्येष्ठांनी मोफत बूस्टर डोस घेतला.
सध्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यातच मिळणारी बूस्टर डोससाठी ३५० रुपये मोजायची इच्छा नसल्याने बूस्टर डोस नकोच असे लोक म्हणून लागले आहेत. परंतु, शासनाने ही लस मोफत सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत ही बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे.
३८ लाख ६९ हजार ३४६ जणांनी घेतला पहिला डोस
सुरुवातीच्या काळामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. शहरातील सर्व केंद्रांवर लस घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच १५ वयोगटापासून ते ६० वर्षांवरील ज्येष्ठ अशा ३८ लाख ६९ हजार ३४६ जणांनी पहिला डोस घेतला.
३२ लाख ४३ हजार ५९३ जणांनी घेतला दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी ४५ दिवसानंतर तर कोविशिल्ड घेतलेल्यांना ९० दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस देण्यात येत होता. तोही अगदी मोफत होता. दरम्यानच्या काळात कोरोना प्रभाव कमी होऊ लागल्याने नागरिकांनीही याकडे पाठ फिरवली. त्यामुळे आजअखेरपर्यंत ३२ लाख ४३ हजार ५९३ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
६८ केंद्रांवर मिळतेस लस
पुणे महानगरपालिकेने नागरिकांना मोफत लस देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ६८ केंद्रांची उभारणी केली होती. या केंद्रांच्या माध्यामातून लोकांना लस देण्यात येत होती. या केंद्रांवरच लोकांना लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.
शहरात १८ ते ५९ वयोगटातील ज्या नागरिकांना दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत, आता त्यांनाही कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस मोफत मिळत आहे. नागरिकांनी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. महापालिकेकडे सर्व लसींचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत. - डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका
१९ ते ५९ वयोगटातील बूस्टर डोस घेतलेल्यांची दिवसनिहाय संख्या
१५ जुलै २०२२- २८२८
१६ जुलै २०२२- ६३४०
१७ जुलै २०२२- ०
१८ जुलै २०२२- ५१८६
१९ जुलै २०२२- ४८१७
एकूण- १९१७१