सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुल्कवाढी विरोधात 'घंटानाद आंदोलन'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 03:01 PM2022-07-11T15:01:18+5:302022-07-11T15:03:23+5:30
आपापली अभ्यासाची कामे करत करत २४ तास विद्यार्थी आंदोलनात सहभागी...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाढवलेल्या भरमसाठ शुल्काविरोधात विद्यार्थ्यांनी आजपासून बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. शेवटी आजपासून सर्व विद्यार्थी मिळून त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मुख्य इमारत आवारातील संविधान स्तंभाजवळ बेमुदत घंटानाद आंदोलनास बसले आहेत.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने फक्त पीएच.डी.च्या कोर्सचेच शुल्क पूर्ववत केले आहे. मात्र उर्वरित शुल्क जैसे थेच आहे.
कुलसचिवांनी आंदोलक विद्यार्थ्यांना भेट दिली असता विद्यार्थ्यांनी दिलेल्या संपूर्ण निवेदनाची आणि मागण्यांची त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून झालेली भरमसाठ शुल्कवाढ जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर सर्व आंदोलक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना ठाम आहेत. आपापली अभ्यासाची कामे करत करत २४ तास विद्यार्थी आंदोलनात सहभागी असणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
१) पदव्युत्तर पदवीची शुल्कवाढ पूर्ववत करणे.
२) वसतिगृहाची शुल्कवाढ पूर्ववत करणे.
३) विद्यापीठाशी संलग्नित संशोधन केंद्रांचे शुल्क हे विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे.
४) संशोधक विद्यार्थ्यांचे वसतिगृह लवकरात लवकर चालू करणे.
५) पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची बंद केलेली अधिछात्रवृत्ती सरसकट पुन्हा चालू करणे.
६) अनिकेत कँटीन आणि झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे पूर्वीच्याच जागेवर तत्काळ सुरू करणे.
विद्यापीठ प्रशासनाने भरमसाठ केलेली शुल्क त्वरित मागे घ्यावी. जोपर्यंत शुल्क पूर्ववत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील
- पौर्णिमा गायकवाड, विद्यार्थिनी
जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत तोपर्यंत आम्ही भरपावसात २४ तास आंदोलन करणार आहोत.
- तुषार पाटील निंभोरेकर, विद्यार्थी
विद्यापीठ प्रशासनाने केलेली शुल्कवाढ ही फार चुकीची पद्धतीची आहे. कोणत्याही प्रकारचे विद्यार्थीहित या शुल्कवाढीमध्ये नसून गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
- तुकाराम शिंदे, विद्यार्थी