घरगुती गणेश विसर्जन घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:54 AM2017-07-30T03:54:32+5:302017-07-30T03:54:32+5:30
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीत, विहिरीत, ओढ्यात विसर्जित होऊ नयेत यासाठी यंदाही महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
पुणे : प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीत, विहिरीत, ओढ्यात विसर्जित होऊ नयेत यासाठी यंदाही महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. मागील वर्षी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तब्बल ६० हजार नागरिकांनी आपली गणेश मूर्ती सार्वजनिक पाण्यात विसर्जित न करता, घरातील पाण्यात विसर्जित केली. यंदाच्या वर्षी त्यापेक्षा जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, यासाठी आता गणेश मूर्ती विक्रेत्यांकडेच अमोनियम कार्बोनेट देण्यात येणार आहे.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नाही. त्याचे लहानलहान तुकडे पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी जाऊन अडकतात. उत्सवानंतर मोठ्या प्रमाणात अशा गणेश मूर्ती विसर्जित होत असतात असे आढळल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी म्हणून घरगुती गणेश मूर्तींचे घरातच विसर्जन करा, अशी चळवळ राबविण्यात येत आहे.
पुणे शहरात २ लाखांपेक्षाही अधिक संख्येने घरगुती गणेश मूर्ती बसवतात. या सर्व मूर्तींचे सार्वजनिक ठिकाणीच विसर्जन होत होते. त्यातूनच या चळवळीला सुरुवात झाली; मात्र पाण्यात मूर्तीचे विसर्जन लवकर होत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे त्या पाण्यात अमोनियम कार्बोनेटची पावडर मिक्स करण्यात येऊ लागली. तसे केल्याने मूर्तीचे लवकर विघटन होते. नंतर ते पाणी बागेतील झाडांना, वृक्षांना टाकले, तरी त्यापासून काहीही धोका होत नाही. पुण्यातील गणेश मूर्तींची संख्या लक्षात घेता काही टन अमोनियम कार्बोनेट लागणार होते. त्यामुळेच मागील वर्षी महापालिकेने यात पुढाकार घेतला.
मागील वर्षी महापालिकेने सुमारे ७० टन अमोनियम कार्बोनेट खरेदी केले होते. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय पावडरचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात
आली. तब्बल ६० हजार नागरिकांचा याला प्रतिसाद मिळाला. काही
संस्था, संघटना यांनी या
प्रकाराला विरोध केला, मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असेच दिसले. त्यामुळेच यंदाच्या वर्षी महापालिकेने १०० टन अमोनियम कार्बोनेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे यावर्षीही घरोघरी वाटप करण्यात येणार आहे.
महापौर मुक्ता टिळक यांनीही या चळवळीला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच विधिवत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे पावडरचे वाटप घरोघरी करण्याऐेवजी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची विक्री करणाºया स्टॉलधारकांनाच ते देण्यात यावे. त्यांनी मूर्ती घेऊन जाणाºयांना ते द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. याही वर्षी क्षेत्रीय कार्यालये व प्रभाग कार्यालयांमधून ही पावडर नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी तिथे स्वतंत्र व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
‘हिंदू जनजागृती समिती’चा विरोध
गणेश मूर्ती विसर्जनसाठी अमोनियम कार्बोनेट वापरण्याचा निर्णय महापालिकेने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. हा निर्णय धर्मशास्त्राच्या विरोधात असल्याचे समितीचे म्हणणे आहे. मागील वर्षी महापालिकेच्या या प्रयत्नांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित केली की, त्यातील गणेशतत्त्व पाण्यासह सर्वदूर पसरते व वातावरणाची शुद्धी होते, असा युक्तिवाद समितीने केला आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता असूनही असा निर्णय होणे दुर्दैवी असल्याचे समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी म्हटले असून, महापालिकेने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
महापालिकेने यावर्षी १०० टन अमोनियम कार्बोनेट घेतले आहे. स्थायी समितीने त्यासाठी खास परवानगी दिली आहे. नजीकच्या महापालिका कार्यालयांच्या माध्यमातून ते नागरिकांना उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. मागील वर्षी या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षी ती संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे.
- सुरेश जगताप, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पाण्यात लगेच विरघळते, त्यामुळे अशा मूर्तींसाठी ही पावडर वापरण्याचा प्रश्नच नाही, मात्र प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे पाण्यात विघटन होत नाही. त्यामुळे पाण्याचे स्रोत बंद होतात. तसे होऊ नये यासाठी अशा मूर्तींचे विसर्जन घरगुतीच करावे. त्यातून पर्यावरण संवर्धनाचे काम होईल.
- मुक्ता टिळक, महापौर