भाजपशी संबंधित ठेकेदारालाच काम मिळवून देण्याचा घाट : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:49+5:302021-05-18T04:12:49+5:30
पुणे : महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये कंत्राटी पध्दतीने सुरक्षा पुरविण्यासाठी काढलेल्या निविदांमध्ये, भाजपशी संबंधित नेत्यांच्या जवळच्या ठेकेदारांना काम मिळवून देण्याचा ...
पुणे : महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये कंत्राटी पध्दतीने सुरक्षा पुरविण्यासाठी काढलेल्या निविदांमध्ये, भाजपशी संबंधित नेत्यांच्या जवळच्या ठेकेदारांना काम मिळवून देण्याचा घाट घातला आहे. ऐन कोरोना संकटात कोट्यवधी रुपयांची या निविदा कशासाठी काढण्यात येत आहेत, असा प्रश्न उपस्थित करून ही प्रक्रिया तत्काळ रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक व माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी केली महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे़
याबाबत पत्रकार परिषदेत शिंदे यांनी माहिती दिली़ ते म्हणाले की, महापालिकेला कंत्राटी पध्दतीने दीड हजार सुरक्षा रक्षकांच्या पुरवठ्यासाठी ज्या निविदा काढण्यात आल्या आहेत, त्यामध्ये या अटी-शर्ती घातल्या आहेत, त्या ठराविक कंपन्यांनाच मिळावी त्यादृष्टीनेच ठरविल्या आहेत. त्यामुळे केवळ क्रिस्टल आणि सैनिक या दोन कंपन्या पात्र ठरतील अशा पद्धतीने ही निविदा प्रक्रिया राबविली जात असून, यामधील एक कंपनी मुंबईतील, तर दुसरी पिंपरी-चिंचवडमधील भाजप नेत्यांशी संबंधित आहे़ दरम्यान, या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीने राज्य सरकारच्या नियमानुसार सुरक्षारक्षकांना वेतन दिले नसल्याने अद्याप त्या कंपनीची चौकशी सुरू आहे. असे असतानाही ही कंपनीही या निविदा प्रक्रियेत पात्र ठरली आहे, याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे़