मैदान खासगी संस्थेला देण्याचा घाट

By admin | Published: February 5, 2016 01:51 AM2016-02-05T01:51:46+5:302016-02-05T01:51:46+5:30

महापालिकेचे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम व्यावसायिक क्रिकेट अकादमीस भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे.

Ghat to give field to private institution | मैदान खासगी संस्थेला देण्याचा घाट

मैदान खासगी संस्थेला देण्याचा घाट

Next

मिलिंद कांबळे,  पिंपरी
महापालिकेचे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम व्यावसायिक क्रिकेट अकादमीस भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. आर्थिक उत्पन्नवाढीसाठी हे केले जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिक आणि खेळाडंूना मैदानात प्रवेशच मिळणार नसल्याने खेळास चालना देण्याचा मूळ हेतूला हरताळ फासला जाणार आहे.
महापालिकेचे १९९२ पासून स्टेडिअम देखभाल-दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सुरक्षारक्षक, ग्राउंडमन आणि इतर कामांसाठी लाखो रुपये खर्च प्रतिमहिना आहे. मैदानास ३०० रुपये प्रति दिवस भाडे आहे. त्याद्वारे नऊ हजार रुपये उत्पन्न मिळते. तुलना केली असता खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत असून, महापालिका तोट्यात आहे. त्यातच जकात आणि एलबीटी बंद झाल्याने क्रीडा विभागाच्या खर्चावर मर्यादा आली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
मैदान २५ वर्षे दीर्घकालीन भाडेकरार तत्त्वावर देण्यासंदर्भात एका खासगी क्रिकेट अकादमीचा प्रस्ताव आला आहे. संपूर्ण मैदानाची देखभाल आणि दुरुस्ती अकादमी करणार असून, त्या मोबदल्यात दरमहा ३० हजार रुपये उत्पन्न महापालिकेस दिले जाणार आहे. नवोदितांना क्रिकेटचे सशुल्क प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. काही क्रीडा पर्यवेक्षक, अधिकारीच यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.
मात्र, एकदा का मैदान खासगी अकादमीच्या ताब्यात गेले की, स्थानिकांना मैदानात प्रवेश दिला जात नाही. हे सत्य आहे. पुणे आणि शहर परिसरात प्रति दिनी ३ ते १० हजार रुपये भाडे आहे. या पद्धतीने अधिक शुल्क आकारणी करून संस्था व्यावसायिक हेतू साध्य करू शकते. परिणामी सर्वसामान्यांना मैदानात प्रवेश कायमचा बंद होणार असल्याचे स्थानिक खेळाडूंनी सांगितले.
महापालिकेचा एक पैसाही खर्च न होता खासगी संस्था मैदानाची देखभाल आणि दुरुस्ती करणार असा प्रस्ताव होता. मोबदल्यात ठरावीक उत्पन्न महापालिकेस मिळणार आहे. तसेच, खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मैदानाबाहेरील जॉगिंग ट्रॅकचा वापर नागरिकांना करता येईल. शहरातील अनेक भागांत छोटी-मोठी मैदाने आहेत. ती सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत रिकामी असतात. त्या काळात ती खासगी शाळा व महाविद्यालयांस वापरण्यास देता येतील. स्टेडिअमवर वर्षाला १५ ते १६ लाखांचा खर्च होतो. त्यात बचत होणार आहे. - समीर मासूळकर, सभापती, क्रीडा समिती
तसा काही प्रस्ताव अजून प्राप्त झालेला नाही. स्टेडिअमला वर्षभरात मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची माहिती घेतली जात आहे. त्याची तुलना केली जाणार आहे. क्रीडा सभापती समीर मासूळकर यांनी खासगी अकादमीस मैदान भाड्याने देण्यासंदर्भात विषय मांडला होता. मात्र, प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यास विचार केला जाईल.- दत्तात्रय फुंदे, क्रीडा विभाग

Web Title: Ghat to give field to private institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.