Ghatsthapana 2021: जेजुरीच्या खंडोबा गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:50 IST2021-10-07T16:50:45+5:302021-10-07T16:50:54+5:30
खंडोबा गडावर गुरुवारी सकाळी ११:३० वाजता परंपरेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली अन् नवरात्रउत्सवास प्रारंभ करण्यात आला.

Ghatsthapana 2021: जेजुरीच्या खंडोबा गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर गुरुवारी सकाळी ११:३० वाजता परंपरेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली अन् नवरात्रउत्सवास प्रारंभ करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी भाविकभक्तांना देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. श्रींची पहाटेची पूजा पुरंदर चे आमदार संजय जगताप यांचे हस्ते करण्यात आली.
त्यानंतर मुख्य मंदिर गाभाऱ्यामध्ये पाकाळणी विधी करण्यात येऊन उत्सव मूर्तींना माजी विश्वस्त सुधीर गोडसे यांच्या वतीने नवीन पोशाख परिधान करण्यात आले. त्यानंतर घडशी समाजबांधवांच्या सनई -चौघड्याच्या मंगलमय निनादात खंडोबा - म्हाळसदेवींच्या उत्सवमूर्ती पुजारी, सेवेकरी यांनी रंगमहाल (बालद्वारी ) येथे आणण्यात आल्या.
त्यानंतर वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी व आठवडेकरी पुजारी आशिष बारभाई ,अभिजित बारभाई यांच्या वेदमंत्र पठणात विधिवत घटस्थापना करण्यात आली. धार्मिक विधी करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियम ,अटी ,सूचनांचे पालन करण्यात आले. याबाबत देवसंस्थान व्यवस्थापनाच्या वतीने काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. खंडेरायाचा मुख्य गाभारा पाना - फुलांनी सजविण्यात आला असून गडकोट आवाराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांनी देवदर्शनासाठी येताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियम ,व सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सुमारे ६ महिन्यानंतर खंडोबा मंदिर भाविकांना देवदर्शनासाठी खुले होत असल्याने पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सपत्नीक जेजुरी गडावर येऊन पहाटेची पूजा केली. तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मध्यान्हीच्या सुमारास गडावर दाखल होत देवदर्शन घेतले. कोरोना महामारीचा नायनाट होऊ दे ,सणउत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे ,अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.