गझलचे विश्व काळजाला भिडणारे

By admin | Published: March 1, 2016 12:52 AM2016-03-01T00:52:31+5:302016-03-01T00:52:31+5:30

धार्मिक संघर्ष, माणसांची वजाबाकी नष्ट करीत गझलेने वैश्विक ऐक्य निर्माण केले आहे. कलात्मक जाणिवांची लोकशाही निर्माण करणारी, मराठी वाङ्मय संस्कृतीला झळाळी देणारी

Ghazal's world faces pain | गझलचे विश्व काळजाला भिडणारे

गझलचे विश्व काळजाला भिडणारे

Next

पुणे : धार्मिक संघर्ष, माणसांची वजाबाकी नष्ट करीत गझलेने वैश्विक ऐक्य निर्माण केले आहे. कलात्मक जाणिवांची लोकशाही निर्माण करणारी, मराठी वाङ्मय संस्कृतीला झळाळी देणारी, सांस्कृतिक संचिताचे वैभव वाढवणारी गझल काळजाला भिडते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विसंवाद आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्वाणीच्या वाटेवर अभिव्यक्त होणारी गझल ही मूल्यात्मक मांडणी आणि शब्दांच्या महिरपीतून व्यक्त होते, असे मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
प्रेरणा आर्ट फाउंडेशन आयोजित गझलकारा मीना शिंदे यांच्या ‘कातर वेळी’ या गझलांच्या अल्बमचे प्रकाशन श्रीपाल सबनीस व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गझलकार इलाही जमादार, अनिल कांबळे, संजय शिंदे, मीना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, की कोणते सूर, स्वर आणि शब्द यांचा मिलाफ कोठे होईल, हे सांगता येणार नाही. स्वर-शब्दांची भेट ही योगायोगावर अवलंबून असते. हे माझे शेवटचे गाणे, अशी भावना ठेवून प्रत्येक गाण्याकडे, कवितेकडे पाहिले, तर सर्वोत्तम कलाकृती जन्माला येते.
मीना शिंदे म्हणाल्या, ‘‘मूक झाले शब्द माझे, साथ त्यांनी सोडली, भावना माझ्या मनाची, आसवे का बोलली’ अशी माझी अवस्था आहे. गझलांमधून आयुष्याचा खरा अर्थ उलगडत जातो. त्यामुळेच गझलांमधील कल्पनाविलास, व्याप्ती मन व्यापते.’’ डॉ. मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Ghazal's world faces pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.