घोड नदीचे पात्र कोरडे, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू; बंधाऱ्यांचे ढापे काढल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:02 PM2024-06-27T15:02:33+5:302024-06-27T15:02:56+5:30
मंचर ( पुणे ) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ...
मंचर (पुणे) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई नदीकाठच्या गावांना जाणवत असून, काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय.
घोड नदीवर आंबेगाव शिरूर तालुक्यात सुमारे २५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळा संपला की बंधाऱ्याचे ढापे टाकून बंधारे पाण्याने भरून घेतले जातात. त्यानंतर या पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी होत असतो. वर्षभर बहुतेक बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतात. पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस संबंधित बंधाऱ्याचे ढापे पाटबंधारे विभागाकडून काढले जातात. यावर्षी त्याप्रमाणे हे ढापे काढण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. थोड्याशा जागेत पाणीसाठा शिल्लक असला तरी बहुतेक घोड नदी कोरडी झाली आहे. यावर्षी आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी वळवाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असला तरी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी नदीतून अद्याप पाणी वाहिलेले नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंप बंधाऱ्यात टाकून त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात होता. आता बंधाऱ्यातील पाण्यानेच तळ गाठल्याने वीजपंप बंद आहेत.
शेतातील पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. नदीकाठी असलेल्या विहिरीतून अनेक गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. आता या विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अनेक गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय. सध्या पावसाचे वातावरण झाले असून, सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नजीकच्या काळात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अजून भीषण होणार आहे.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग गावाला घोड नदीकाठी असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होतो. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत सदर विहीर असल्याने वर्षभर पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र बंधाऱ्याचे ढापे काढण्यात आल्याने आता विहिरीने तळ गाठला आहे. वीजपंप दिवसाआड कसाबसा तीन तास चालू राहतो. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करता येत नाही. शिवाय विजेचा लपंडाव सुरू असतो. घोड नदीला पाणी आल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
-वैभव पोखरकर, सरपंच, श्री क्षेत्र वडगाव, काशिंबेग